उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला छत्तीसगडची राजधानी रायपूर येथून अटक करण्यात आली आहे. आरोपीनी शनिवारी रात्री सुरक्षा मुख्यालयात फोन करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती.
पोलिसांनी कॉल लोकेशन ट्रेस करताना आरोपीला रायपूरच्या टिकरापारा पोलीस स्टेशन परिसरातून अटक केली. फोन कॉल्स आणि लोकेशन ट्रेस केल्यानंतर अवघ्या 5 दिवसांत आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
2 मार्च रोजी पोलीस नियंत्रण कक्षाच्या सीयूजी नंबरवर सीएम योगींना धमकीचा कॉल आला होता. हा कॉल हेड कॉन्स्टेबलने उचलला. हेड कॉन्स्टेबलला फोन करणाऱ्याने सांगितले की, आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवले जाईल. यानंतर कॉन्स्टेबलने तुम्ही कुठून बोलत आहात? असे विचारले असता कॉलरने लगेच कॉल डिस्कनेक्ट केला.
यानंतर महानगर पोलीस ठाण्यात सुरक्षा मुख्यालयात तैनात कॉन्स्टेबल उधम सिंग यांच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके तैनात करण्यात आली होती.