ऑक्टोबर १९९६ मध्ये (२८ वर्षांपूर्वी) उद्योगपती फरीद मकबुल हुसेन यांच्या हत्येप्रकरणी विशेष न्यायालयाने गँगस्टर एजाज लकडावाला याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत त्याला अतिरिक्त पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दरम्यान कथित मुख्य सूत्रधार छोटा राजनची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आशिष पाटील यांनी या खटल्याचा निकाल गुरुवारी जाहीर केला.
काय आहे प्रकरण?
७ ऑक्टोबर १९९६ रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास व्यावसायिक सय्यद फरीद मकबुल हुसेनवर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळय़ा झाडल्या होत्या. मोहम्मद अली रोडवरील हुसेनच्या दुकानात ही घटना घडली होती. हल्लेखोरांनी गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला होता. हुसेनला तातडीने रुग्णालयात नेले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. मात्र, सायंकाळी ७ वाजता गस्तीवर असलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांनी दोन हल्लेखोरांना पकडून त्यांच्याकडून रिव्हॉल्व्हर जप्त केले. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला होता की, न्यायवैद्यक अहवालात मृताच्या शरीरातून जप्त करण्यात आलेल्या गोळ्या आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या बंदुकीतून मारण्यात आल्याची पुष्टी झाली आहे. ४ ऑक्टोबर २०२२ रोजी हत्येचा खटला सुरू झाला होता. सरकारी पक्षाने एकूण १३ साक्षीदार तपासले.
फरीदला गोळ्या घालणाऱ्या दोन व्यक्तींना विशेष न्यायालयाने १९९८ मध्ये निर्दोष सोडले होते. फिर्यादी पक्षाने दावा केला होता की, जेव्हा दोन हल्लेखोरांनी फरीदवर हल्ला केला. त्यावेळी लकडावाला फरीदच्या कार्यलयात होता. लकडावालाचे वकील देवानंद मणेरकर म्हणाले की, सविस्तर आदेशाची प्रत मिळाल्यावर त्या विरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल.
फरीदच्या भावाने आपल्या वक्तव्यात दावा केला होता की, तो फरीदला रुग्णालयात घेऊन जात असताना हल्लेखोरांनी त्याला सांगितले की, त्याने हल्लेखोरांसमोर आपल्या जीवाची भीक मागितली, पण त्यांनी दया दाखवली नाही. भावाच्या जीवाची भीक मागायची असेल, तर नाना यांच्याकडे मागायला सांगितले. फरीदच्या भावाने असेही सांगितले की, त्यावेळी नाना कोण आहे, हे त्याला माहिती नव्हते, पण नंतर कळाले की, तो छोटा राजन होता.