आज नवी दिल्लीच्या भारत मंडपममध्ये नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड सोहळा पार पडला. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल क्रिएटर्सना नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड देण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान बोलताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
मल्हार कळंबे यांना ‘स्वच्छता दूत’ श्रेणीतील पहिला राष्ट्रीय निर्माता पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी ‘स्वच्छता अभियाना’मध्ये पंतप्रधानांसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, “सर्व प्रकारची साफसफाई करता येते, या निवडणुकीतही स्वच्छता होणार आहे (या निवडणुकीतही क्लीन स्वीप होणार आहे)”, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना टोला लगावला.
पंतप्रधान 20 श्रेणींमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय निर्माते पुरस्कार प्रदान करत होते. कथाकथन, सामाजिक बदलाची वकिली, पर्यावरणीय स्थिरता, शिक्षण, गेमिंग, इतर क्षेत्रांमध्ये उत्कृष्टता आणि प्रभाव ओळखणे हे या पुरस्काराचे उद्दिष्ट आहे. तसेच सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सर्जनशीलतेचा वापर करण्यासाठी एक लॉन्चपॅड म्हणून या पुरस्काराची कल्पना करण्यात आली आहे.
या पुरस्कार सोहळ्यात 1.5 लाखांहून अधिक नामांकन आणि सुमारे 10 लाख मते पडली असून 20 विविध श्रेणींमध्ये 1.5 लाखांहून अधिक नामांकन प्राप्त झाले आहेत. सर्वोत्कृष्ट कथाकार पुरस्कारासह 20 श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यामध्ये मोस्ट क्रिएटिव्ह क्रिएटर, बेस्ट स्टोरी टेलर, दि बेस्ट क्रिएटर फॉर सोशल चेंज, सेलिब्रेटी क्रिएटर, ग्रीन चॅम्पिअन, टेक क्रिएटर, हेरिटेज फॅशन, स्वच्छ अॅम्बेसिडर, कल्चरल अॅम्बेसिडर, दि बेस्ट क्रिएटर इन एज्युकेशन आणि आंतरराष्ट्रीय क्रिएटर अॅवॉर्ड या अॅवॉर्ड्सचा समावेश आहे.
या पुरस्कार सोहळ्यात संबोधित करताना पंतप्रधानांनी डिजिटल निर्मात्यांना त्यांच्या कटेंटसह जागतिक प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यास सांगितले. “चला ‘क्रिएट ऑन इंडिया’ चळवळ सुरू करण्यासाठी एकत्र येऊ या. भारताची गोष्ट जगासोबत शेअर करूया. असे कंटेट तयार करा ज्यामुळे तुमच्या देशाला लाईक्स मिळण्यास मदत होईल. यासाठी तुम्हाला जागतिक प्रेक्षकांशी जोडले जावे लागेल,” असे पंतप्रधान म्हणाले.
कंटेंट निर्मात्यांना ‘जागतिक मंचावर भारताचे डिजिटल राजदूत’ असे संबोधून पंतप्रधान म्हणाले, “तुम्ही जगातील कोणत्याही कोपऱ्यात एका सेकंदात पोहोचू शकता. तुम्ही स्थानिक नावीन्यपूर्ण आवाजाचे ब्रँड ॲम्बेसेडर आहात. तसेच या पुरस्कार सोहळ्याचे श्रेय या देशातील तरुणांना आणि प्रत्येक डिजिटल कंटेंट निर्मात्याला जाते”, असेही पंतप्रधान म्हणाले.
पुढे पीएम मोदी म्हणाले की, नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड्सला भविष्यात महत्त्वाचे स्थान असेल. “लोक मला विचारतात माझ्या यशाचे रहस्य काय आहे. पण मी सगळ्यांना उत्तर देत नाही. कोणताही रेस्टॉरंट मालक तुम्हाला स्वयंपाकघर दाखवेल का? देवाच्या कृपेने, मला वेळेआधीच समजू शकते. म्हणूनच मी म्हणू शकतो की या पुरस्काराचे (नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड्स) भविष्यात महत्त्वाचे स्थान असेल.
पंतप्रधान मोदींनी सर्व निर्मात्यांचे विशेषत: पुरस्काराने सन्मानित झालेल्या महिलांचे अभिनंदन केले. “आज ज्यांना नॅशनल क्रिएटर्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे, त्यांचे मी अभिनंदन करतो. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे, मी सर्व मुलींचे अभिनंदन करतो. मला तुम्हा सर्वांचा खूप अभिमान आहे. तसेच मी देशातील आणि जगातील महिलांना माझ्या शुभेच्छा देतो. आज मी गॅस सिलिंडरची किंमत 100 रुपयांनी कमी केली आहे”, असेही ते म्हणाले.