प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर पोस्ट करत याची माहिती दिली.
ट्विटमध्ये पंतप्रधानांनी सुधा मूर्ती यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत महिला दिनी त्यांना या नियुक्तीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टवर म्हंटले आहे की, भारताच्या राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती यांचं नामांकन राज्यसभेसाठी झाल्याने मला आनंद होत आहे. सुधा मूर्ती यांचं सामाजिक कार्य, शिक्षण यांसह विविध क्षेत्रात योगदान मोठे आणि प्रेरणादायी आहे. राज्यसभेतील मूर्ती यांची उपस्थिती असणे ही आमच्या ‘नारी शक्ती’चा एक शक्तिशाली पुरावा आहे. त्यांचा संसदेतील सहभाग हा आपल्या देशाचं नशीब घडवण्यासाठी आलेल्या महिलांच्या सामर्थ्याचे उदाहरण आहे. त्यांना संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा.
सुधा मूर्ती यांनी आपल्या लिखाणाने इंग्रजी आणि कन्नड साहित्यात योगदान दिले आहे तसेच 31 डिसेंबर 2021 रोजी इन्फोसिस फाऊंडेशनचे अध्यक्ष म्हणून त्या नुकत्याच निवृत्त झाल्या आहेत. सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल त्यांना 2023 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने तर 2006 मध्ये पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी असून यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासू आहेत
याबाबत प्रतिक्रिया देत मूर्ती यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधान आभार मानले आहेत “मी आनंदी आहे, त्याच वेळी मला वाटते की मला अधिक जबाबदारी देण्यात आली आहे. मी माझ्या स्तरावर सर्वोत्तम काम करेन. वैयक्तिक स्तरावर, मला गरिबांसाठी काम करण्यासाठी एक मोठे व्यासपीठ मिळाल्याचा मला आनंद आहे,” सुधा मूर्ती यांनी आज एएनआयला सांगितले आहे. .