आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमॉक्रटिक पार्टीशी (पीडीपी) युती करणार नसल्याचे नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी म्हंटले आहे. पीडीपीकडे विश्वासार्हता नसल्यामुळे ही युती नाकारत असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात आज, शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यासंदर्भात ओमर अब्दुल्ला म्हणाले की, नॅशनल कॉन्फरन्सच्या जागा गमावून त्यांना भागीदारी करावी लागेल असे त्यांना कळले असते तर त्यांचा पक्ष विरोधकांच्या आयएनडीआयए आघाडीत सहभागी झालाच नसता. राहुल आणि सोनिया गांधी यांनी काँग्रेससाठी सोडायचे म्हटले तर ते पीडीपीऐवजी काँग्रेसला सोडण्यास प्राधान्य देतील, असे ओमर म्हणाले.काँग्रेस क्रमांक दोनवर, तर पीडीपी तिसऱ्या क्रमांकावर असल्याचा दावा त्यांनी केला. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला सत्तेत आणल्यानंतर आणि जनतेच्या जनादेशाचा विश्वासघात केल्यानंतर पीडीपीकडे विश्वासार्हता उरलेली नाही. नॅशनल कॉन्फरन्स काश्मीर खोऱ्यातील लोकसभेच्या तीनही जागा स्वतंत्रपणे लढवेल आणि स्वबळावर जिंकेल असा विश्वास अब्दुल्ला यांनी यावेळी व्यक्त केला.