शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. ईडीने बारामती अॅग्रोच्या संबंधित संपत्ती जप्त केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने कन्नड सहकारी कारखाना जप्त केला आहे.
ईडीकडून रोहित पवार यांच्याशी संबंधित बारामती अॅग्रो संबंधित औरंगाबादमधील कन्नड साखर कारखान्यातील 161.30 एकरची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत साखर कारखान्याची इमारत, जमीन, शुगर प्लांट आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. ईडीच्या या कारवाईनंतर रोहित पवारांना मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे.
राज्य सहकारी बँकेने कन्नड सहकारी साखर कारखान्याचा लिलाव केला होता. हा कारखाना रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो लिमिटेडने 50 कोटी रूपयांमध्ये खरेदी केला होता. तर या प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या लिलाव प्रक्रियेमधील कंपन्यांचे एकमेकातले व्यवहार हे संशयास्पद असल्याचा आरोप ईडीने केला आहे. या लिलावात बारामती अॅग्रो, समृद्धी शुगर आणि हायटेक इंजिअरिंग या कंपन्या सहभागी आहेत. तर हायटेक कंपीनेने लिलावासाठी 5 कोटी रूपयांची रक्कम भरली होती. ती रक्कम बारामती अॅग्रोकडून घेतल्याचे म्हटले जात आहे. तसेच बारामती अॅग्रोने विविध बँकांतून खेळत्या भांडवलासाठी घेतलेली रक्कम कारखाना खरेदीसाठी वारल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी ईडीने बारामती अॅग्रोची चौकशी केली होती.
दरम्यान, ईडीने बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी छापेमारी केली होती. तसेच या प्रकरणी रोहित पवारांची दोन वेळा चौकशी करण्यात आली आहे. अशातच आता ईडीकडून कन्नड कारखान्याशी संबंधित संपत्ती जप्त करण्यात आली आहे.