महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १८ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केले. या मेळाव्यातून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तोफ डागत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.
“काल मुस्लिम मोहल्ल्यात गेलो होतो. आंदोलन झाल्यावर भोंगे बंद झाले पण सरकार ढिल्लं पडले आहे. एकदा माझ्या हातात हे राज्य द्या, सर्व भोंगे एकसाथ बंद करतो. बघू कुणात हिंमत आहे पुन्हा भोंगा लावण्याची. माझ्या हातात सरकार द्या, एकसाथ सर्व भोंगे बंद करतो,समुद्रावर अनधिकृत दर्गा बांधत होते. एका रात्रीत पाडायला लावला होता . “असे म्हणत राज ठाकरे कडाडले आहेत. .
यावेळी राज ठाकरे यांनी पत्रकारांवरही अस्त्र सोडले आहे “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात पत्रकार नव्हते. हे बरे झाले. नाहीतर पत्रकार परिषदेत विचारलं असतं, महाराज तो गनिमी कावा सांगता का काय असतो तो?आपले विरोधक हे पत्रकारितेतही आहेत. ते सर्व गोष्टी पसरवतात. ते सुरुवात करतात. शेवट करत नाही.
गुढीपाडव्याच्या दिवशी खूप गोष्टी बोलणार आहे. ९ एप्रिलला शिवतीर्थावर सभा घेणार आहे. आतापर्यंत एकदी आंदोलन अर्धवट सोडलेले नाही. पण, अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काय झाले? असा प्रश्न ठाकरेंनी राज्यसरकारला विचारला आहे.
राज ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीचे उदाहरण देताना भाजपाचे आजचे यश हे मोदींचे नसून 1952 सालापासून जनसंघाच्या माध्यमातून लढत आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं आहे असं सांगितले आहे.
ज्या प्रकारचं राजकारण सुरु आहे त्यावरुन कोण कुठे आहे काही कळत नाही. कोणाचं नाव घेतलं तर विचारावं लागतं, कुठे आहे म्हणजे तो?” असे म्हणत राज ठाकरेंनी सध्या राज्यातील दोन प्रमुख पक्षांमध्ये म्हणजेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीवरुन टोला लगावला. पुढे बोलातना राज ठाकरेंनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख करत आतून हे सारे लोक एकच असल्याची शंकाही बोलून दाखवली आहे.
यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत संयम बाळगा असा संदेश राज ठाकरेंनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला आहे मला माझी पोरं कडेवर घ्यायचीत. दुसऱ्याची पोरं कडेवर घ्यायची नाहीत, असं म्हणत त्यांनी ठाकरी भाषेत राजकीय पक्षांना टोलाही लगावला आहे.