धरमशाला कसोटी सामन्यात इंग्लंडचा यावेळी तीनच दिवसात खेळ खल्लास झाला. आधीचे चारही सामने चौथ्या दिवसापर्यंत गेले होते. टीम इंडियाचा आजचा हा विजय खूप ऐतिहासिक आहे कारण कसोटी क्रिकेटमध्ये 112 वर्षांनंतर, पहिल्या कसोटी सामन्यात पराभवानंतर संघाने 4-1 पाच सामन्यांची कसोटी मालिका जिंकली आहे.
मालिकेतील पहिला सामना गमवल्यानंतर टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केले. पाचव्या कसोटीत नाणेफेकीचा कौल जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि इथेच सर्वकाही फसले पहिल्या डावात इंग्लंडने सुरुवात चांगली केली. पण कुलदीप यादव, आर अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या फिरकीच्या जाळ्यात इंग्लंडचे गोलंदाज सहज अडकले. इंग्लंडचा पहिला डाव 218 धावांवर आटोपला. त्यानंतर भारताने पहिल्या डावातील इंग्लंडची 218 धावांची आघाडी मोडली. तसेच सर्वबाद 477 धावा केल्या.
यावेळी भारतात आघाडीचे फलंदाज नसताना टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जबरदस्त कामगिरी केली. त्यामुळे दिग्गज खेळाडूंची उणीव कुठेच भासली नाही. उलट नवोदित खेळाडूंना संधी मिळाल्याने त्यांना आपली चमकदार कामगिरी दाखवण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचे त्यांनी सोने केले.
पाचव्या सामन्याच्या दुसऱ्या डावात आर अश्विनने कमाल केली. इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत पाठवला आणि विजयावर मोहोर उमटवली.आर अश्विनने 14 षटकं टाकत 5 गडी बाद केले. आर अश्विनने पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 5 गडी बाद केले.यामुळे त्याने आता भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे याला मागे टाकले आहे. अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये यावेळी ३६ व्यांदा पाच विकेट्स घेतले आहेत. याचसोबत तो भारतासाठी सर्वाधिक वेळा पाच विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे
आता भारताने मालिका 4-1 ने जिंकल्याने टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे. गुणातालिकेतील अव्वल स्थान कायम ठेवलं असून विजयी टक्केवारीत वाढ झाली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड कसोटी सामन्याचा निकाल काहीही लागला तरी त्याचा भारताच्या अव्वल स्थानावर काही एक परिणाम होणार नाही. त्यामुळे आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीकडे खऱ्या अर्थाने भारताने कूच केली आहे. भारताला आता बांगलादेशविरुद्ध 2 कसोटी, न्यूझीलंडविरुद्ध 3 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.