बंगळुरूतील रामेश्वरम कॅफेत झालेल्या बाॅम्बस्फोट प्रकरणातील संशयित दहशतवादी पुण्यात आल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) व्यक्त केला आहे. बाॅम्बस्फोट घडविल्यानंतर संशयित दहशतवादी बसने कर्नाटकातील बल्लारीपर्यंत गेला. त्यानंतर भटकल, गोकर्ण, बेळगाव, कोल्हापूरमार्गे तो पुण्यात पोहोचल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, संशयित दहशतवादी नक्की पुण्यात पोहोचला किंवा वाटेत त्याने बस बदलली का, याबाबत एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला नाही.
१ मार्च रोजी बंगळुरूतील रामेश्वरम कॅफेत बाॅम्बस्फोट घडविण्यात आला. स्फोटकांनी भरलेली पिशवी ठेवून संशयित दहशतवादी तेथून पसार झाला. स्फोटानंतर तपास यंत्रणांनी रामेश्वरम कॅफेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले. चित्रीकरणात संशयित दहशतवादी आढळून आला. चित्रीकरणाद्वारे संशयिताची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. बाॅम्बस्फोट घडविल्यानंतर संशयित बंगळुरूतून बसने पसार झाला. बल्लारी स्थानकात तो बसमधून उतरल्याची माहिती एनआयएच्या पथकाला मिळाली. तेथील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेण्यात आले आहे.
स्फोटानंतर पाच दिवसांनी, एनआयएने बल्लारी येथील ‘इसिस मॉड्यूल’मधून चार जणांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मिनाज उर्फ मोहम्मद सुलेमान (२६), अनस इक्बाल शेख (२३), शायन रहमान उर्फ हुसेन (२६) तर सय्यद समीर (१९) यांचा समावेश आहे. कॅफे स्फोटातील संशयित, या आरोपीचा पलायनाचा मार्ग सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोधण्यात आला होता. तो दोन आंतरराज्य सरकारी बसेसमधून बल्लारी आणि अन्य अज्ञात ठिकाणी गेल्याचे दिसत आहे. संशयिताने पलायन केलेल्या मार्गाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो कॅफेच्या अगदी जवळ असलेल्या बस स्टॉपवरून व्होल्वो बस (KA 47 F 4517) मध्ये चढताना दिसतो. संशयिताने कॅफेपासून सुमारे ३ किमी दूर कपडे बदलले, तिथे त्याने घातलेली बेसबॉल कॅप आणि शर्ट काढला आणि कॅज्युअल टी-शर्टमध्ये बदलला.
घटनास्थळावरून बेसबॉल कॅप जप्त करण्यात आली असून हा या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्फोटाच्या दिवशी दुपारी ३ च्या सुमारास बेंगळुरूच्या बाहेरून शहरापासून ६० किमी अंतरावर असलेल्या तुमकूरला निघालेल्या सरकारी बसमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित देखील दिसला. बसमध्ये लावलेल्या कॅमेऱ्यात टोपीशिवाय आणि नवीन कपड्यातील संशयितांचे फोटो कैद झाल्याचे सांगितले. तुमकूरला जाताना तो बसमधून खाली उतरल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.
रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित दहशतवाद्याची माहिती देणाऱ्यास एनआयएने १० लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असेही म्हटले आहे.