पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, शनिवारी अरुणाचल प्रदेशच्या त्यांच्या ईशान्येकडील राज्याच्या दौऱ्यात चीन-भारत वास्तविक नियंत्रण रेषेपासून (एलएसी) सुमारे 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या जगातील सर्वात लांब द्विपदरी सेला बोगद्याचे उद्घाटन केले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींचा हा मोठा मास्टरस्ट्रोक आहे. सुमारे 825 कोटी रुपये खर्चून बांधलेला सेला बोगदा प्रकल्प हा एक अभियांत्रिकी चमत्कार आहे. हा बोगदा 13 हजार फूट उंचीवर आहे. हा बोगदा पश्चिम कामिंग आणि तवांग यांना जोडेल. पूर्वी सेला खिंडीतून तवांगला जावे लागत असे. हिवाळ्यात खिंडीत बर्फ साचल्याने रस्ता बंद व्हायचा. त्यामुळे 2019 मध्ये पंतप्रधान मोदींनी स्वतः या बोगद्याची पायाभरणी केली होती. सुमारे 825 कोटी रुपये खर्चून हा बोगदा बांधण्यासाठी 4 वर्षे लागली. या बोगद्याचे दोन भाग आहेत, ज्यांची लांबी अनुक्रमे 1595 मीटर आणि 1003 मीटर आहे. या प्रकल्पात 8.6 किमी लांबीच्या दोन रस्त्यांचाही समावेश आहे. या बोगद्यातून दररोज 3 हजार कार आणि 2 हजार ट्रक जाऊ शकतात. या बोगद्यातून ताशी 80 किलोमीटर वेगाने वाहने धावू शकतील. यामुळे तवांगला जाण्यासाठी लष्कराला 10 किलोमीटर कमी अंतर कापावे लागणार आहे. हे अरुणाचल प्रदेशातील बलीपारा-चारद्वार-तवांग रोडवरील सेला खिंड ओलांडून तवांगला सर्व-हवामान कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनने नवीन ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीचा वापर करून त्याचे बांधकाम केले आहे. यात सर्वोच्च मानकांची सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. हा बोगदा सुरू झाल्यानंतर तेजपूर ते तवांगमधील अंतर एक तासाने कमी होणार आहे. या बोगद्याची पायाभरणी पंतप्रधानांनी फेब्रुवारी 2019 मध्ये केली होती.
हा प्रकल्प केवळ या प्रदेशात जलद आणि अधिक कार्यक्षम वाहतूक मार्ग प्रदान करणार नाही तर देशाला सामरिक शक्ती देखील प्रदान करेल. आता लष्कराची वाहने सर्व प्रकारच्या हवामानात बिनदिक्कतपणे एलएसीपर्यंत पोहोचू शकतील आणि चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना संरक्षण उपकरणे, रसद, शस्त्रे व यंत्रसामग्री झटपट आणि सहज उपलब्ध होईल. पूर्व भागात भारतीय लष्कराच्या बळकटीकरणामुळे चीनमध्ये घबराट पसरली आहे. वास्तविक, तवांगमधून भारतीय लष्कराच्या वाहनांच्या हालचालींवर चीनची अनेक दिवसांपासून नजर होती. आता या बोगद्याच्या निर्मितीमुळे भारतीय लष्कराच्या वाहनांवरची चिनी पाळत थांबेल आणि भारतीय लष्कराची वाहने चीनी रडारच्या बाहेर होतील. भारतीय लष्कराच्या हालचाली आणि लष्करी तैनाती चीनला कळू शकणार नाही. चीन अनेक दिवसांपासून या भागावर उंचावरून नजर ठेवून आहे.