काल (9 मार्च) 71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा मोठ्या थाटात पार पडली.मिस वर्ल्ड या स्पर्धेचा ग्रँड फिनाले जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे झाला. तर यंदा चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोव्हा ही मिस वर्ल्ड 2024 ठरली आहे.
क्रिस्टिना पिस्कोव्हाने यंदाचा मिस वर्ल्डचा 2024 चा किताब जिंकला आहे. माजी मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलावस्काने क्रिस्टिना पिस्कोव्हाला मिस वर्ल्डचा क्राऊन दिला. तर यंदाची रनर-अप लेबनॉनची यास्मिना ठरली आहे. तसेच या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सिनी शेट्टीने टॉप 8 मध्ये स्थान मिळवले होते. नंतर ती टॉप 4 मधून बाहेर पडली. मिस त्रिनिदाद आणि टोबॅगो, मिस लेबनॉन, मिस बोत्सवाना आणि मिस चेक रिपब्लिक यांनी टॉप 4 मध्ये आपले स्थान निर्माण केले होते.
तब्बल 28 वर्षांनंतर भारतात पार पडलेल्या मिस वर्ल्ड या स्पर्धेचे होस्टींग करण जोहर आणि मिस वर्ल्ड 2013 मेगन यंग फिलिपिन्स यांनी केले. तर या स्पर्धेच्या फिनालेच्या परीक्षकांमध्ये बारा जणांचा समावेश होता. यामध्ये साजिद नाडियादवाला, क्रिती सेनन, पूजा हेगडे, अमृता फडणवीस, रजत शर्मा, हरभजन सिंग, विनीत जैन, ज्युलिया मोर्ले सीबीई आणि इतर अनेकांचा समावेश होता.
दरम्यान, मिस वर्ल्ड 2024 ठरलेली क्रिस्टिना पिस्कोव्हा हिचे क्रिस्टिना पायस्को फाउंडेशन नावाचे एक फाउंडेशन आहे. तसेच क्रिस्टिनाने गरीब मुलांसाठी इंग्रजी शाळा सुरू केली आहे. सोबतच तिने टांझानियामधील मुलांसाठी अनेक कामे केली आहेत.