पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (10 मार्च) उत्तर प्रदेशातील वाराणसी दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींनी शनिवारी संध्याकाळी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात पूजा केली. त्यानंतर आज दुपारी ते आझमगडमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
पीएम मोदी या कार्यक्रमात उत्तर प्रदेशसाठी 42,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन पायाभरणी करणार आहेत. यावेळी ते जनतेला संबोधितही करणार आहेत.
याशिवाय, पंतप्रधान मोदी छत्तीसगडमध्ये महतरी वंदना योजनेंतर्गत पहिला हप्ता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दुपारी 2:15 वाजता वितरित करणार आहेत. तसेच पीएम मोदी उत्तर प्रदेशमध्ये 19,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.
पीएम मोदी ग्राम सडक योजनेंतर्गत बांधण्यात आलेले 3700 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 744 ग्रामीण रस्ते प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत. उत्तर प्रदेशात एकूण 5,400 किलोमीटरहून अधिक ग्रामीण रस्त्यांचे बांधकाम होणार आहे.
पीएम मोदी सुमारे 8200 कोटी रुपयांच्या अनेक रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत, ज्यामुळे उत्तर प्रदेशातील रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत होतील.
तसेच पंतप्रधान नागरी विमान वाहतूक क्षेत्राला मोठी चालना देणाऱ्या देशभरातील 9800 कोटी रुपयांच्या 15 विमानतळ प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. सोबतच ते पुणे, कोल्हापूर, ग्वाल्हेर, जबलपूर, दिल्ली, लखनौ, अलीगड, आझमगड, चित्रकूट, मुरादाबाद, श्रावस्ती आणि आदमपूर विमानतळावर 12 नवीन टर्मिनल इमारतींचे उद्घाटन करणार आहेत.