आज (10 मार्च) पुणे महानगरपालिकेतर्फे नेदरलँड आणि जर्मनीच्या सहकार्याने वारजे येथील प्रभाग क्र. 30 मध्ये उभारण्यात येणाऱ्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसह अन्य विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनील कांबळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशात पहिल्यांदाच जर्मनी आणि नेदरलँडच्या आर्थिक सहकार्याने वारजे येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल होत आहे. नेदरलँडच्या विमा कंपनीने जोखमिची हमी घेतली असल्यामुळे सर्वदृष्टीने हा प्रकल्प फायदेशीर आहे. तसेच या रूग्णालयात नेदरलँडने मान्य केलेल्या जागतिक दर्जाच्या सुविधा असतील. हा प्रकल्प यशस्वी झाला तर पुण्यासह महाराष्ट्रात खाजगी भागिदारीतून अशा आरोग्य सुविधा उभारता येतील. सोबतच रूग्णालयाच्या खर्चावरील व्याजाचा दर केवळ सव्वा टक्के असल्यामुळे रूग्णालयातील दरही कमी असतील.
वारजे येथे उत्तम दर्जाचे पोलीस स्थानक उभारण्यात येईल, त्यासाठी पुणे महानगरपालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच पुणे, पिंपरी चिंचवड, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्र हे राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन असल्यामुळे या भागाच्या विकासासाठी राज्य शासन सर्व सहकार्य करेल, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.