लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असतानाच भाजपला मोठा धक्का बसला आहे. हिसारमधील भाजप खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी पक्षाला रामराम केला आहे. खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी भाजप पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
ब्रिजेंद्र सिंह यांनी X वर पोस्ट शेअर करत त्यांच्या राजीनाम्याची माहिती दिली आहे. ब्रिजेंद्र सिंह यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “राजकीय अपरिहार्यतेमुळे मी भाजप पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मला हिसार लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
https://twitter.com/BrijendraSpeaks/status/1766706322727117222
भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ब्रिजेंद्र सिंह हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
https://twitter.com/ANI/status/1766725159321227595
दरम्यान, 2014 मध्ये ब्रिजेंद्र सिंह यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपने त्यांना केंद्रात मंत्री केले होते. तसेच भाजपने गेल्या लोकसभा निवडणुकीत ब्रिजेंद्र सिंह यांना हिसार मतदारसंघातून रिंगणात उतरवले होते. त्यावेळी 3 लाख 14 हजार मतांनी त्यांचा विजय झाला होता. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जननायक पार्टीशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे ब्रिजेंद्र सिंह यांचे तिकिट कापले जाण्याची शक्यता होती, यामुळे ते नाराज होते. यापार्श्वभूमीवर त्यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला