आज (10 मार्च) शिवसेना उबाठा पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यात बोलताना भास्कर जाधवांनी उद्धव ठाकरेंवरील आपली नाराजी व्यक्त केली. उद्धव ठाकरेंची सत्ता येईल, पण मला मंत्रीपद मिळणार नाही. हे मी आजच कार्यकर्त्यांना सांगत आहे. तसेच त्यांनी अपेक्षाही ठेऊ नये. कारण मला मंत्रीपद देताना म्हणतील, हा रागीट व्यक्ती आहे. त्याच्याऐवजी दुसऱ्याला मंत्रीपद दिले पाहिजे. याआधीही सत्ता आली तेव्हा मला मंत्रीपद मिळायला हवे होते, पण मिळाले नाही. त्यानंतरही मी कधीही काही बोललो नाही, अशी खंत जाधव यांनी व्यक्त केली.
मी उद्धव ठाकरे यांच्यासाठी लढतो आहे. पण मला मंत्रीपद मिळाले नाही, गटनेतेपद मिळाले नाही. यापुढेही मिळणार नाही, हे मला माहिती आहे. मी उद्धव साहेबांना म्हणालो होतो की तुमच्या मनात माझ्याबद्दल जे असेल ते असू द्या. पण मी 2024 विधानसभा निवडणूक होईपर्यंत तुमची साथ सोडणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देत आहे, असे भास्कर जाधव म्हणाले.
पुढे त्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्यावर भाजप हल्ला करत होते. त्यावेळी मंत्रीपद मिळालेले सर्वजण गप्प होते. पण मी एकट्याने त्यावेळी भाजपवर हल्ला चढवला होता.
ज्यावेळी पक्ष फुटला त्यावेळी गटनेता म्हणून माझाच दावा होता. पण त्यावेळी मला गटनेते केले नाही. तेव्हाही मी काही बोललो नाही. तसेच 20 तारखेला मतदान झाले आणि 21 तारखेला मी येथेच होतो. त्यानंतर मला उद्धव ठाकरेंचा फोन आला. त्यामुळे मी मुंबईला गेलो. तेव्हा उद्धव ठाकरेच्या वर्षा बंगल्यावर बैठक झाली होती. त्या बैठकीत मी उद्धव ठाकरेंना स्पष्ट सांगितलं होतं की, तुम्ही भाजपसोबत गेला तर मी तुमच्यासोबत नसणार. मग उद्धव ठाकरेंनी मला सांगितलं की, सर्वजण गेले तरी चालतील, आपण दोघे रोहिलो तरी चालेल. पण आपण दोघे मिळून भाजपसोबत लढत राहू, असेही भास्कर जाधव म्हणाले.