लोकसभा निवडणुकीपू्र्वी राजस्थानमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण काँग्रेस पक्षाच्या 32 नेत्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे निकटवर्तीय, माजी कॅबिनेट मंत्री लालचंद कटारिया यांच्यासह 32 नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
आज जयपूर येथील भाजप प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री भजनलाला शर्मा, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांच्या उपस्थितीत या 32 नेत्यांचा मेगा ज्वाईनिंग कार्यक्रम पार पडला. यावेळी काँग्रेसच्या या नेत्यांसोबत त्यांचे अनेक कार्यकर्ते देखील भाजपमध्ये आले आहेत.
काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या या 32 नेत्यांमध्ये लालचंद कटारिया यांच्यासह माजी आमदार रिछपाल मिर्धा, राजेंद्र यादव, विजयपाल मिर्धा, अलोक बेनीवाल, भीलवाडचे माजी जिल्हाध्यक्ष रामपाल शर्मा यांचा समावेश आहे.
भाजप पक्षात प्रवेश केल्यानंतर लालचंद कटारिया म्हणाले की, मी आंतरात्म्याच्या संकेतामुळे भाजपमध्ये सहभागी झालो आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या आहेत. तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला पुढे नेण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत.