लोकसभा निवडणुकीआधीच केंद्रीय निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. तसेच त्यांचा राजीनामा राष्ट्र्पती द्रौपदी मुर्मू यांनी स्विकारला आहे. अरूण गोयल यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत होता, मात्र त्याधाची त्यांनी राजीनामा दिल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. तर अरूण गोयल यांनी राजीनामा दिल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगात एकमेव सदस्य उरला आहे. या पार्श्वभूमीवर नवीन आयुक्ताच्या नेमणुकीसाठी येत्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
निवडणूक आयोगात सध्या आयुक्तपदाची दोन पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी येत्या 15 तारखेला पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक होऊ शकते. तसेच काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी हे देखील निवड समितीत आहेत.
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे येत्या तीन दिवसांमध्ये राज्यांचे दौरे पूर्ण होणार आहेत. हे दौरे पूर्ण झाल्यानंतर कोणत्याबी क्षणी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. पण, त्यापूर्वी आता सरकारसाठी नवीन निवडणूक आयुक्त नेमणे क्रमप्राप्त ठरले आहे. तसेच लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मे मध्ये होणार आहेत. या निवडणुका जाहीर झाल्या झाल्या आदर्श आचारसंहिता लागू होईल.
दरम्यान, केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या राजपत्रातील अधिसूनेमध्ये म्हटले आहे की, निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे, जो 9 मार्च 2024 पासून प्रभावी मानला जाईल.
लोकसभा निवडणूक काही आठवड्यांवर येऊन ठेपली असतानाच अरूण गोयल यांनी राजीनामा दिला आहे. अरूण गोयल यांनी राजीनामा दिल्यामुळे आता फक्त मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार उरले आहेत. तर भारतीय निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांव्यतिरिक्त दोन निवडणूक आयुक्त आहेत. तसेच गोयल यांनी राजीनामा दिल्यामुळे आता निवडणूक यंत्रणेची संपूर्ण जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे आहे.