पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सक्षम महिला-विकसित भारत कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी ते कृषी ड्रोनचे प्रात्यक्षिकही पाहणार आहेत. पंतप्रधान कार्यालय (PMO) नुसार, हा कार्यक्रम भारतीय कृषी संशोधन संस्था (पुसा, नवी दिल्ली) येथे होणार आहे.
यामध्ये देशभरातील 11 वेगवेगळ्या ठिकाणांहून नमो ड्रोन दीदी सहभागी होणार आहेत. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान 1,000 नमो ड्रोन दीदींना ड्रोन सुपूर्द करणार आहेत. तसेच दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाच्या पाठिंब्याने यश संपादन केलेल्या लखपती दीदींचा पंतप्रधान मोदी सन्मान करणार आहेत. या प्रसंगी पंतप्रधान मोदी प्रत्येक जिल्ह्यात बँकांनी स्थापन केलेल्या बँक लिंकेज कॅम्पद्वारे बचत गटांना (SHGs) सवलतीच्या व्याजदरावर सुमारे 8,000 कोटी रुपयांची बँक कर्जे वितरित करणार आहेत.
याशिवाय, पंतप्रधान स्वयंसहाय्यता गटांना सुमारे 2,000 कोटी रुपयांचा भांडवली सहाय्य निधी देखील प्रदान करणार आहे. नमो ड्रोन दीदी आणि लखपती दीदी उपक्रम हे विशेषत: ग्रामीण भागात महिलांमध्ये आर्थिक सक्षमीकरण आणि आर्थिक स्वायत्तता वाढवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेचा अविभाज्य भाग आहेत.
पंतप्रधान मोदी आज दुपारी राजस्थानमधील पोखरण येथे त्रि-सेवा थेट फायर आणि सरावाच्या रूपात स्वदेशी संरक्षण क्षमतेचे समन्वित प्रदर्शन ‘भारत शक्ती’चे साक्षीदार होणार आहेत. यावेळी स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान तेजस, लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर आणि प्रगत हलके हेलिकॉप्टर तैनात केले जाणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच जनतेला द्वारका एक्सप्रेस वे भेट देणार आहेत. गुरुग्राम (हरियाणा) येथे पंतप्रधानांच्या आगमनासाठी सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी द्वारका द्रुतगती मार्गाला लागून असलेल्या सेक्टर-84 च्या मैदानात भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. हरियाणा कॉरिडॉरच्या उद्घाटन समारंभात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री कृष्ण पाल गुर्जर, केंद्रीय मंत्री जनरल व्हीके सिंह, उपमुख्यमंत्री दुष्यंत सिंह चौटाला, राज्य प्रभारी बिप्लव कुमार देव, नायब सैनी, मंत्री मूलचंद शर्मा, मंत्री ओमप्रकाश यादव, खासदार अरविंद शर्मा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.