एक ते दीड वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये फूट पडली आहे. त्यानंतरची कायदेशीर लढाई आणि इतर बाबी आपण पाहतच आलोय. दरम्यान ठाकरे गटाकडे असणारे आमदार रवींद्र वायकर यांनी काल ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम केला आहे. कारण आमदार रवींद्र वायकर यांनी वर्ष बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. वायकर हे ठाकरेंच्या विश्वासू नेत्यांपैकी एक होते.
गेल्या काही महिन्यांपासून आमदार रवींद्र वायकर यांच्यावर ईडीची कारवाई सुरु आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडी कारवाई टाळण्यासाठी रवींद्र वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी आपण शिंदे गटात प्रवेश केल्याचे रवींद्र वायकर यांनी पक्षप्रवेशावेळी स्पष्ट केले.
कोण आहेत रवींद्र वायकर
रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. त्यांच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का समजला जात आहे. १९९२ मध्ये वायकर नगरसेवक झाले. २००९,२०१४ आणि २०१९ मधून रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व मधून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले. महायुती आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्री राहिले. तसेच ते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री देखील राहिले आहेत.