लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असतानाच अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. कारण अजित पवारांचे विश्वासू आमदार निलेश लंके हे त्यांची साथ सोडणार आहेत. तसेच निलेश लंके हे दादांची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे अजित दादांसाठी हा मोठा धक्काच आहे.
निलेश लंके हे शरद पवार गटात पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे. तसेच निलेश लंके यांना नगर दक्षिणमधून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतून निलेश लंके यांच्या विरूद्ध भाजपकडून सुजय विखे पाटील अशी लढत होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वीच शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना पक्षप्रवेशासाठी खुली ऑफर दिली होती. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीच्या तक्त्याला घाम फोडणारा असा लोकनेता आमच्या खांद्याला खांदा लावून संसदेत यावा. तसेच लोकनेत्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी नगर दक्षिणमध्ये वाजवलीच पाहिजे, असे अमोल कोल्हेंनी म्हटले होते.
दरम्यान, आता निलेश लंके हे शरद पवार गटात पक्ष प्रवेश करणार आहेत. आज शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. यावेळी शरद पवार त्यांची उमेदवारीही जाहीर करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.