आज (11 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे आयोजित सशक्त महिला-विकसित भारत कार्यक्रमादरम्यान 1000 दीदींना ड्रोन सुपूर्द केले. या कार्यक्रमात विविध राज्यातील अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांना आधुनिकतेसोबत शेतीत हातभार लावता यावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी सरकार मोफत प्रशिक्षणही देत आहे.
पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दिलेल्या माहितीनुसार, भारतीय कृषी संशोधन संस्थेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देशभरातील 11 वेगवेगळ्या ठिकाणांहून नमो ड्रोन दीदी सहभागी झाल्या आहेत.
या कार्यक्रमात महिलांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने आजचा कार्यक्रम अतिशय ऐतिहासिक आहे. आज मला नमो ड्रोन दीदी मोहिमेअंतर्गत महिला बचत गटांना 1 हजार आधुनिक ड्रोन्स सुपूर्द करण्याची संधी मिळाली आहे. तसेच मी ठरवले आहे की, आम्हाला आता 3 कोटी लाखपती दीदींचा आकडा पार करायचा आहे. याच उद्देशाने आज या दीदींच्या खात्यात 10,000 कोटी रुपये ट्रान्सफर झाले आहेत.
“कोणताही देश असो, कोणताही समाज असो तो महिला शक्तीचा सन्मान वाढवून आणि त्यांच्यासाठी नवीन संधी निर्माण करूनच पुढे जाऊ शकतो. परंतु दुर्दैवाने देशातील मागील सरकारने तुम्हा सर्व महिलांचे जीवन, तुमच्या समस्यांना कधीच प्राधान्य दिले नव्हते”, अशी टीका पंतप्रधानांनी विरोधकांवर केली.
पुढे ते म्हणाले, “मला विश्वास आहे की महिला शक्ती 21 व्या शतकातील तांत्रिक क्रांतीचे नेतृत्व करण्यास सक्षम आहे. महिला अंतराळ क्षेत्र, आयटी क्षेत्र आणि विज्ञान क्षेत्रात पुन्हा पुन्हा यश मिळवत आहेत. जगात महिला व्यावसायिक वैमानिकांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. तसेच येत्या काही वर्षांत ड्रोनच्या वापराच्या अपार शक्यता आहेत. ड्रोन पायलट बनणाऱ्या महिलांचे भविष्य अनेक शक्यतांनी भरलेले असेल. चांगल्या कनेक्टिव्हिटीमुळे, खेड्यात राहणाऱ्या महिला आता शहरांमध्ये त्यांची उत्पादने विकू शकतात.”
“ज्यांच्या आकांक्षा एकेकाळी जबरदस्तीने घरापुरत्या मर्यादित होत्या, त्या आता राष्ट्र उभारणीत योगदान देत आहेत. मी तुम्हाला खात्री देतो, आमची तिसरी टर्म महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय लिहिणार आहे”, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.