पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांना फोन करून ही धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर शिवराय कुलकर्णी यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
आज (11 मार्च) सकाळी 11 वाजून 18 मिनिटांनी मला एक फोन आला होता. या कॉलवर युनायटेड किंगडम असे नमूद होते. तर या कॉलवर आरोपीने स्वत:ला खलिस्तान समर्थक दर्शवून पंतप्रधान मोदीजी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच या कॉलमध्ये करण्यात आलेली सर्व वक्तव्ये भारत विरोधी आहेत. त्यामुळे या कॉलचा तपास करण्यात यावा आणि देशविरोधी शक्तींना आवर घालण्याची उचित कारवाई करण्यात यावी, असे शिवराय कुलकर्णी यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 6 दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली होती. अशातच आज पुन्हा एकदा त्यांना धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मोहम्मद रसून कद्दरे या व्यक्तीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत धमकी दिली होती.