बॉलीवूडचे दिवंगत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना ऑस्करच्या ‘इन मेमोरिअम’ सेगमेंटमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. ऑस्कर 2024 हॉलिवूड, लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला होता.
यावेळी नितीन देसाई यांच्याशिवाय जागतिक मनोरंजन क्षेत्रातील इतर उल्लेखनीय व्यक्तींचेही या क्षेत्रात स्मरण करण्यात आले. नितीन देसाई यांना टीना टर्नर, मॅथ्यू पेरी आणि इतर अनेकांसह ऑस्करच्या ‘इन मेमोरिअम’ सेगमेंटमध्ये भावनिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
नितीन देसाई हे त्यांच्या नाविन्यपूर्ण स्टुडिओ डिझाइन्ससाठी ओळखले जात होते आणि त्यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांसारख्या चित्रपट निर्मात्यांसोबत काम केले होते. हम दिल दे चुके सनम (2000), लगान (2002), देवदास (2003), जोधा अकबर (2008) आणि प्रेम रतन धन पायो (2015) यांसारख्या चित्रपटांमधील कामामुळे ते प्रसिद्धीझोतात आले होते.
सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी नितीन देसाई यांना तीन फिल्मफेअर पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले होते. तर 2 ऑगस्ट 2023 रोजी त्यांचे निधन झाले. देसाई महाराष्ट्रातील कर्जत येथील त्यांच्या स्टुडिओमध्ये मृतावस्थेत आढळून आले होते. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले असून, उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.