राजनैतिक वादामुळे मालदीवच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि मालदीवमध्ये सुरू असलेल्या राजनैतिक वादाचा मालदीवच्या पर्यटनावर परिणाम होताना दिसत आहे. या वादामुळे पर्यटन व्यवसायात नुकसान सहन करून मालदीवला मोठी किंमत मोजावी लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मालदीवला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत 33 टक्क्यांनी घट झाली आहे. तर आकडेवारीनुसार, 04 मार्च 2023 पर्यंत 41,054 भारतीय पर्यटक मालदीवमध्ये गेले होते. तर 02 मार्च 2024 पर्यंत मालदीवमध्ये येणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या घटून 27,244 झाली आहे.
सध्या मालदीवमध्ये चिनी पर्यटकांची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षी मालदीवला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या बाबतीत भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश होता, मात्र यावर्षी भारत दुसऱ्या स्थानावरून सहाव्या स्थानावर आला आहे.
दरम्यान, या वर्षी पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली होती. त्यावेळी त्यांचे लक्षद्वीपवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर मुइज्जू सरकारमधील मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. “पंतप्रधान मोदी हे मालदीवमध्ये जाणाऱ्या भारतीय पर्यटकांना भारतातच पर्यटन करण्यासाठी आकर्षित करत आहेत”, अशी टीका मुइज्जू सरकारमधील मंत्र्यांनी केली होती. त्यामुळे तेव्हापासून भारतीय नागरिकांमध्ये मुइज्जू सरकारविरोधात संतापाची भावना आहे. तसेच या वादामुळे मालदीवला भेट देणाऱ्या भारतियांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.