लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपाने आपल्या लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये भाजपाने माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना तिकीट दिले आहे. मात्र कट्टर हिंदुत्ववादी नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साध्वी प्रज्ञा यांना भाजपाने उमेदवारी नाकारली आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या ऐवजी भाजपाने भोपाळमधून अलोक शर्मा यांना तिकीट दिले आहे. केंद्रातील मोदी सरकारकाचा हिंदुत्वाचा अजेंडा प्रखरपणे राबवत असताना साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची उमेदवारी नाकारल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान आता NIA कोर्टाने साध्वी प्रज्ञा यांच्याविरुद्ध वॉरंट जारी केले आहे.
मालेगाव येथील २००८ बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. साध्वी प्रज्ञा या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीला सोडवी प्रज्ञा या उपस्थित नव्हत्या. त्यामुळे एनआयए कोर्टाने त्यांना वॉरंट बजावले आहे. १० हजार रुपयांच्या जामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी येत्या २० मार्चपर्यंत करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. साध्वी प्रज्ञा या अंतिम जबाब नोंदणी प्रक्रियेला हजर राहत नाहीयेत. त्यामुळे या खटल्याचा निकाल लागण्यास उशीर होत असल्याचा आरोप इतर आरोपींनी केला आहे. याची दखल घेत विशेष न्यायालायने साध्वी प्रज्ञा यांच्याविरुद्ध वॉरंट जारी केले आहे.
दरम्यान यंदाच्या निवडणुकीसाठी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने भोपाळमधून साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारी नाकारली आहे. भोपाळमधून अलोक शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.त्यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त करून दाखवली होती. मी २०१९ मध्ये देखील उमेदवारी मागितली नव्हती आणि आताही मागितली नाहीये. मी मध्ये एक वक्तव्य केले होते. ते वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवडले नव्हते. ते म्हणाले होते, मला माफ करणार नाही. पण मी माफी मागितली होती, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली आहे. त्यांच्या या बोलण्यावरून पंतप्रधान मोदींची नाराजी असल्याने त्यांना तिकीट मिळाले नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.