‘महायुतीमधील जागावाटपाचा निर्णय दोन ते तीन दिवसांत होणार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यासह मित्र पक्ष यांच्या जागा निश्चित झाल्यानंतर बारामतीचा उमेदवार जाहीर करण्यात येईल,’’ असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर ते बोलत होते.
ते म्हणाले की, ‘‘सद्यःस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इतका समर्पक नेता देशात दुसरा कुणी नाही. देशाचे पंतप्रधान चोवीस तास काम करत आहेत. त्यांनी गेल्या नऊ वर्षांत एकदाही सुट्टी घेतलेली नाही. त्यांच्यामुळे भारत देशाकडे जगाचे लक्ष लागले आहे. भारत काय करतोय, याकडे सगळ जग पाहते आहे. मोदी यांच्याकडे देशाच्या विकासाचा एक अजेंडा आहे. विकसित देशाचे रोलमॉडेल मोदी यांच्याकडे आहे.’’
महाविकास आघाडीचा बारामती मतदारसंघातील उमेदवार जाहीर झाला असून, आमचाही उमेदवार लवकरच घोषित करू. महायुतीच्या ४८ जागांचा निर्णय झाल्यानंतर आम्ही आमचे उमेदवार जाहीर करू. आम्ही किती जागा मागितल्या हे जाहीर करणार नाही परंतु, तिन्ही पक्षांचा सन्मान राहील अशा पद्धतीने जागावाटप होईल हे नक्की आहे.
तसेच राज्यातली मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह मी दिल्लीला जाणार आहे. तिथे जागावाटपावर चर्चा होईल. जागावाटप उद्या अंतिम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोनच दिवसांत याबाबत चित्र स्पष्ट झालेले दिसेल, असे पवार यांनी या वेळी सांगितले.