हरियाणाच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. खट्टर यांनी कर्नालमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, भाजप आणि जननायक जनता पार्टी (जेजेपी) यांची युती तुटण्याच्या मार्गावर आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांची युती तुटू शकते.
मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आज सकाळी 11.30 वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला भाजप आणि सरकार समर्थित अपक्ष आमदार उपस्थित राहणार आहेत. तर आता भाजप अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करू शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटप होऊ शकले नाही. या कारणामुळे युती तुटण्याची शक्यता आहे. तसेच मुख्यमंत्री खट्टर यांच्या कार्यशैलीवर जेजेपीही खूश नसल्याचा दावा केला जात आहे.
हरियाणाच्या भाजप सरकारचे मंत्रिमंडळ आज सामूहिक राजीनामा देऊ शकते, अशीही बातमी समोर आली आहे. यानंतर हरियाणा सरकारच्या मंत्रिमंडळाची नव्याने स्थापना होणार आहे. जननायक जनता पक्षाला मंत्रिमंडळातून वेगळे करण्याची रणनीती आखण्यात आली आहे. याचा अर्थ आता हरियाणात भाजप आणि जेजेपी यांच्यात युती होणार नाही.