2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जींना मोठा झटका बसला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी (ED) टीएमसीवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने कारवाई करत अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खात्यातून कोट्यवधी रुपये जप्त केले आहेत. एका फसवणुकीचा तपास केल्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने टीएमसीच्या खात्यातून तब्बल 10.29 कोटी रुपये जप्त केले आहेत.
ईडीच्या म्हणण्यानुसार, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींसह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी वापरलेल्या हेलिकॉप्टरसाठी टीएमसीला फसवणूक करणाऱ्या कंपनीने पैसे दिले होते. ही कंपनी मेसर्स अल्केमिस्ट ग्रुप आहे, ज्यावर 1800 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. या कंपनीचे मालक माजी राज्यसभा सदस्य कंवर दीप सिंह आहेत.
दोन रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने प्लॉट, फ्लॅट आणि घरे देण्याचे आश्वासन देऊन या ग्रुपने हजारो लोकांकडून कोट्यवधी रुपये उकळले आणि ते पैसे इतर कंपन्यांमध्ये गुंतवले, असा ईडीचा आरोप आहे. यानंतर सीबीआयने कोलकाता आणि लखनौ शाखेत या प्रकरणी एफआयआर नोंदवला होता.
तपासात समोर आले आहे की, ममता बॅनर्जी यांच्या व्यतिरिक्त मुकुल रॉय, मुनमुन सेन, नुसरत जहाँ आणि इतर तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक प्रचारासाठी वापरलेल्या हेलिकॉप्टरसाठी अल्केमिस्ट कंपनीच्या खात्यातून पैसे दिले होते. त्यानंतर ईडीने तृणमूल काँग्रेस पक्षाचे 10.29 कोटी रुपये जप्त केले आहेत.
दरम्यान, ईडीच्या या कारवाईनंतर आगामी काळात ईडी या सर्व नेत्यांना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.