देशामध्ये लवकरच लोकसभेची निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग याबाबत कधीही घोषणा करण्याची शक्यता आहे. तसेच लवकरच आचारसंहिता देखील लागू होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीए आणि इंडी आघाडी यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपाने लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर काल पुन्हा एकदा भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक दिल्लीत पार पडली. त्यामुळे येत्या दोन तीन दिवसांमध्ये भाजप आपली दुसरी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून महायुतीचे जागावाटप देखील लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान चंद्रपूर लोकसभेसाठी विद्यमान आमदार आणि राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नाव चर्चेत आहे. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठकी सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. दरम्यान त्यांच्या नावाची चर्चा सुरु असून याबद्दल माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारले असता सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ”येत्या दोन दिन दिवसांमध्ये दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवारांचे नाव आमच्या यादीत असूच शकत नाही. ते अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या यादीत असू शकते. चंद्रपूर लोकसभेसाठी पक्षाने माझे नाव सुचवले आहे. पक्ष आग्रही आहे. मी दिल्लीत यावे, आणि काम करावे. मात्र मी स्वतः माझे तिकीट कापले जावे यासाठी प्रयत्न करत आहे.”
दरम्यान महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा अजूनही कायमच आहे. वरिष्ठ नेतेमंडळी लवकरच जागावाटप पूर्ण होईल असे म्हणत असले तरी कोणाला किती जागा मिळणार याची स्पष्टता अजून आलेली नाहीये. काल एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जागावाटपाच्या चर्चेसाठी दिल्लीला जाणार होते. मात्र ती बैठक रद्द झाली. ८० टक्के जागावाटप पूर्ण झाले असून, महायुतीमध्ये सर्वांना सन्मानजनक जागा मिळतील असे भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.