पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (12 मार्च) 2014 पासून अर्थसंकल्पात सहा पट वाढ यासारख्या उपक्रमांची यादी केली आणि देशवासियांना आश्वासन दिले की, पुढील पाच वर्षांत रेल्वेचे परिवर्तन त्यांच्या कल्पनेपेक्षा जास्त होईल.
अनेक रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी समारंभाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्या सरकारने रेल्वेला नरक परिस्थितीतून बाहेर काढण्याची इच्छाशक्ती दाखवली आहे. “आता रेल्वेचा विकास हा सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे. हे 10 वर्षांचे काम केवळ ट्रेलर आहे, मला अजून बराच पल्ला गाठायचा आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
“आमच्यासाठी विकास प्रकल्प हे सरकार स्थापन करण्यासाठी नाहीत, तर विकसित भारत घडवण्यासाठी आहेत. आम्हाला सामोरे जावे लागलेल्या संघर्षांना आमच्या भावी पिढ्यांना सामोरे जावे लागू नये. तसेच आमच्या 10 वर्षात आम्ही पूर्व आणि पश्चिम समर्पित फ्रेट कॉरिडॉर देखील तयार केले आहेत. या मागणीला काँग्रेसने अनेक दशकांपासून विलंब केला होता. तर फ्रेट कॉरिडॉर औद्योगिक कॉरिडॉरच्या निर्मितीसाठी उत्प्रेरक म्हणून काम करत आहेत,” असे पीएम मोदी म्हणाले.
देश विकसित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्यामध्ये रेल्वेची महत्त्वपूर्ण भूमिका लक्षात घेऊन पंतप्रधान म्हणाले, “रेल्वेचा कायापालट ही विकसित भारताची हमी आहे. वंदे भारत ट्रेनचे जाळे 250 हून अधिक जिल्ह्यांपर्यंत पोहोचले आहे. सरकार सातत्याने वंदे भारत ट्रेनचे मार्ग विस्तारत आहे. तर आम्ही रेल्वेचे 100% विद्युतीकरण करण्याच्या दिशेने काम करत आहोत. आम्ही रेल्वे स्थानकांना निर्माण होणाऱ्या विजेवर चालवण्याचे नियोजन करत आहोत. त्यासाठी आम्ही सौरऊर्जेचा वापर करत आहोत. तसेच आम्ही रेल्वे स्थानकांमध्ये जनऔषधी केंद्रे स्थापन करत आहोत. या सुधारणांमुळे रेल्वेमध्ये ‘मेड इन इंडिया’साठी एक इकोसिस्टम तयार होईल.”
“स्वातंत्र्यानंतर सरकारने सामाजिक कल्याणापेक्षा राजकीय लाभांना प्राधान्य दिले, ज्याचा सर्वात जास्त परिणाम रेल्वे क्षेत्रावर झाला. 10 वर्षांपूर्वी 6 ईशान्येकडील राज्यांच्या राजधान्यांमध्ये रेल्वे स्थानकांची कमतरता होती. पण, आमच्या सरकारने रेल्वे क्षेत्राचे संपूर्ण रूप पालटले आहे. 2014 पूर्वीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत आम्ही सरासरी रेल्वे बजेट 6 पट वाढवले आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, गती शक्ती कार्गो टर्मिनल धोरणांतर्गत मालवाहू टर्मिनल्सच्या बांधकामात वाढ झाली आहे, कारण जमीन भाडेपट्टा धोरण सुलभ आणि ऑनलाइन करण्यात आले असून त्यामुळे पारदर्शकता आली आहे.
पंतप्रधानांनी रेल्वे आधुनिकीकरणाचा उपक्रम सुरू ठेवला आणि मानवरहित क्रॉसिंग, स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली रद्द करण्याच्या प्रकल्पाची माहिती दिली. ते म्हणाले की, “देश 100 टक्के विद्युतीकरणाकडे वाटचाल करत आहे. तसेच स्थानकांवर सौरऊर्जेवर चालणारी केंद्रे आणि जनऔषधी केंद्रे सुरू होत आहेत. तर या रेल्वे गाड्या, ट्रॅक आणि स्टेशन्सच्या निर्मितीमुळे मेड इन इंडियाची परिसंस्था निर्माण होत आहे.”
“संपूर्ण देशामध्ये विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले जात आहे आणि नवीन उपक्रम घेतले जात आहेत. 2024 च्या अवघ्या 2.5 महिन्यांत आम्ही 11 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांची उद्घाटने आणि पायाभरणी केली आहेत. विकसितच्या आमच्या स्वप्नाकडे आम्ही एक मोठे पाऊल टाकले आहे. आज भारताने 85,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे रेल्वे प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले आहेत,” असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.
दरम्यान, पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केले आणि गुजरातमधील अहमदाबाद येथे समर्पित फ्रेट कॉरिडॉरच्या ऑपरेशन कंट्रोल सेंटरमध्ये 1,06,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. तसेच आजच्या विकास प्रकल्पांमध्ये रेल्वे पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि पेट्रोकेमिकल्स यासह अनेक क्षेत्रांचा समावेश आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी 10 नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.