लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. कारण पुण्यातील मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. वसंत मोरे यांनी प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
वसंत मोरे यांनी पक्षाला राजीनामा दिल्याबाबतची माहिती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये राज ठाकरेंना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात मोरेंनी लिहिले आहे की, मा. श्री राजसाहेब ठाकरे, पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदावर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातल्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो, परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहेत.
भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्यांना ताकद देतो, त्या सहकाऱ्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून ‘कोंडी ‘करण्याचे तंत्र अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती, धन्यवाद, असे वसंत मोरेंनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे पक्षातील काही वरिष्ठांवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. तसेच त्यांनी अनेकदा खदखद देखील व्यक्त केली होती. तर आज सकाळी वसंत मोरेंनी एक पोस्ट शेअर केली होती. “एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस शांत होतो. त्यानंतर तो ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो”, अशी पोस्ट त्यांनी शेअर केली होती. त्यानंतर काही तासातच त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.