भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणूक होण्यासाठी काहीच दिवस उरले आहेत. लवकरच केंद्रीय निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. तसेच लवकरच आचारसंहिता देखील लागू होऊ शकते. सर्वच पक्ष आपापली रणनीती तयार करत आहेत. काँग्रेसने देखील आपली पहिली यादी जाहीर केली आहे. २ मार्च रोजी भाजपाने आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये १९५ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. काल देखील भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली आहे. त्यामुळे भाजपा एक ते दोन दिवसांमध्ये आपली दुसरी यादी जाहीर करू शकते.
काल म्हणजे ११ मार्च रोजी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. दिल्लीतील भाजपामुख्यालयात केंद्रीय समितीची ४ तासांपेक्षा जास्त काळ ही बैठक पार पडली. यामध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश या राज्यांसह १०० जागांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते आहे. महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार हे बैठकीला उपस्थित होते. भाजपा एक दोन दिवसांत आपली दुसरी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. बिहार, ओडिशा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये युतीबाबत स्पष्टता नसल्याने तेथील यादी येण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. कालच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, राजनाथ सिंह, अमित शाह हे उपस्थित होते. तसेच अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
काल झालेल्या भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये बिहारमधील १७ जागांवरील आणि तेलंगणामधील ८ जागांवर चर्चा झाल्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशमधील ४ जागांबाबत देखील चर्चा झाल्याचे समजते आहे. कर्नाटकमध्ये २८ लोकसभेच्या जागा असून, त्यातील ४ ते ५ जागा मित्रपक्षांना जाण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये भाजपा आणि जेडीएसमध्ये युती झाली आहे. बिहारमध्ये देखील युती करण्याबाबत दोन ते तीन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे.