लोकसभा निवडणुकीपूर्वी कुरुक्षेत्राचे खासदार, ओबीसी नेते आणि हरियाणा भाजपचे प्रमुख नायब सिंह सैनी हे हरियाणाचे पुढील मुख्यमंत्री असणार आहेत. चंदीगडमध्ये भाजप आमदारांच्या बैठकीनंतर घोषणा करताना हरियाणाचे भाजप आमदार कृष्ण लाल मिद्धा म्हणाले की, “नायब सिंह सैनी हरियाणाचे पुढील मुख्यमंत्री होणार आहेत. तसेच सर्वजण आता राज्यपालांना भेटणार आहेत.
भाजप आणि मित्रपक्षांचे 6 अपक्ष आमदार आता राज्यपालांची भेट घेणार आहेत. तसेच नवीन मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांचा आज शपथविधी होण्याची शक्यता आहे. 90 सदस्यीय हरियाणा विधानसभेत भाजपचे 41 आमदार आहेत. तर याला 5 अपक्ष आमदार आणि हरियाणा लोकहित पक्षाचे आमदार गोपाल कांडा यांचाही पाठिंबा आहे.
कर्नालचे भाजप खासदार संजय भाटिया म्हणाले की, “आपल्या मंत्रिमंडळाची निवड करणे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे आणि ते पक्षाशी सल्लामसलत करून तसे करतील. आम्ही हरियाणातील लोकसभेच्या सर्व 10 जागा जिंकू.”
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्व 10 संसदीय जागा जिंकल्या होत्या. तर जेजेपी, ज्यांनी AAP सोबत युती करून निवडणूक लढवली होती त्यांना 7 जागांवर लढा देता आला नव्हता.
कुरुक्षेत्राचे खासदार नायब सिंह सैनी यांची गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. नायब सिंह सैनी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कुरुक्षेत्र मतदारसंघातून त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) चे निर्मल सिंह यांच्यावर 3.83 लाख मतांनी विजय मिळवला होता.
नायब सिंग सैनी हे 2014 मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि तेव्हापासून ते मंत्री म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते मनोहर लाल खट्टर यांचे विश्वासू मानले जातात.
सैनी यांचा भाजपमध्ये सहभाग 1996 मध्ये सुरू झाला, जेव्हा ते हरियाणा भाजपच्या संघटनात्मक संरचनेत सामील झाले आणि 2000 पर्यंत त्यांनी राज्य सरचिटणीस म्हणून काम केले. तर 2002 मध्ये ते अंबाला येथील भाजप युवा शाखेचे जिल्हा सरचिटणीस बनले आणि 2005 मध्ये त्यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली.
दरम्यान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आज जननायक जनता पार्टी (जेजेपी) सोबतची भाजपची युती तुटल्यानंतर काही तासांतच राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मनोहर लाल खट्टर यांनी हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांच्याकडे राजीनामा पत्र सुपूर्द केला आहे.