भारत हा जगातला सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश ठरला आहे. स्वीडनच्या ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या (एसआयपीआरआय) अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. भारत हा जगातला सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
अहवालानुसार 2018-22 या काळात भारत, सौदी अरेबिया, कतार, ऑस्ट्रेलिया आणि चीन हे जगातील पाच सर्वात मोठे शस्त्रास्त्र आयातदार देश ठरले आहेत. तर अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन आणि जर्मनी हे पाच सर्वात मोठे शस्त्रास्त्र निर्यातदार देश ठरले आहेत. तर पाकिस्तान हा जगातला आठवा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयात करणारा देश ठरला आहे. पाकिस्तानच्या शस्त्रास्त्र आयातीत गेल्या काही वर्षात 14 टक्क्यांनी वाढ झाली असून चीन हा पाकिस्तानचा मुख्य पुरवठादार असल्याचे या अहवालात म्हटले आहे. तर फ्रान्सने एकूण शस्त्रास्त्र निर्यातीपैकी 30 टक्के निर्यात भारताला केली असल्याचे या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे फ्रान्स हा भारताला शस्त्रपुरवठा करणारा रशियानंतर दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. भारताला शस्त्रास्त्र निर्यात करणारा अमेरिका हा तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. भारताची फ्रान्सकडून शस्त्रास्त्र आयात वाढल्याने रशियाकडून होणारा शस्त्रपुरवठा कमी होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अहवालानुसार 2013-17 च्या तुलनेत 2018-22 या कालावधीत फ्रान्सच्या शस्त्र निर्यातील 44 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, जागतिक शस्त्रास्त्र निर्यातीत अमेरिकेचा वाटा 33 टक्क्यावरून 40 टक्क्यांपर्यंत वाढला असून रशियाचा वाटा 22 टक्क्यांवरून 16 टक्क्यांवर खाली घसरला असल्याचे या अहवालात म्हटले आहे. जागभरातील देशांमध्ये शस्त्रास्त्रांच्या खरेदी-विक्रीत एकूणच घसरण झाल्याचेही दिसून आले आहे. मात्र रशिया- युक्रेन युद्धामुळे युरोपीय देशांमध्ये शस्त्रास्त्रांची खरेदी झपाट्याने वाढली आहे. मध्य पूर्वेतील देशांमध्ये शस्त्रास्त्र आयात करण्याची स्पर्धा लागल्याचे निदर्शनास आले आहे.