पाकिस्तानच्या ‘फर्स्ट लेडी’ म्हणून असिफा भुट्टो बसणार आहेत. त्यांना या पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. असिफा भुट्टो ही अवघ्या 31 वर्षांची आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ती पाकिस्तानचे नवे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांची मुलगी आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ झरदारी यांनी ऐतिहासिक निर्णय घेत आपली मुलगी असिफा भुट्टो हिला देशाच्या प्रथम महिलेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.
फर्स्ट लेडीचा दर्जा सामान्यतः राष्ट्रपतींच्या पत्नीला जातो, परंतु 2007 मध्ये त्यांच्या पत्नी आणि पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची हत्या झाली होती. तर भुट्टो यांच्या मृत्यूनंतर झरदारी यांनी पुनर्विवाह केला नाही आणि ते पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा त्यांच्या पहिल्या कार्यकाळातही (2008 ते 2013) देशाच्या प्रथम महिला पद रिक्त होते.
रविवारी, 68 वर्षीय आसिफ झरदारी यांनी देशाचे 14 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. इस्लामाबादमधील राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी समारंभात झरदारी यांच्यासोबत त्यांची धाकटी मुलगी असिफाही होती. यावेळी अध्यक्ष झरदारी यांनी असिफा भुट्टो हिला पाकिस्तानच्या फर्स्ट लेडीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रथम महिला या प्रतिष्ठित पदावर असिफाची नियुक्ती करण्याचे हे ऐतिहासिक पाऊल देशाच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. अधिकृत घोषणेनंतर, असिफाला प्रथम महिलांनुसार ‘प्रोटोकॉल’ आणि विशेषाधिकार दिले जातील.
8 फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीसाठी पीपीपीच्या प्रचारात असिफाचा सक्रिय सहभाग होता आणि तिने तिचा भाऊ बिलावल भुट्टो झरदारी यांच्या समर्थनार्थ अनेक जाहीर सभाही घेतल्या होत्या. निवडणुकीत बिलावल भुट्टो हे त्यांच्या पक्षाच्या वतीने पंतप्रधानपदाचे उमेदवार होते.
दरम्यान, 30 नोव्हेंबर 2020 रोजी मुलतानमध्ये पीपीपीच्या रॅलीत सहभागी होऊन असिफाने आपला राजकीय प्रवास सुरू केला. पाकिस्तानप्रमाणेच, परदेशातही अशी अनेक उदाहरणे आहेत जेव्हा राष्ट्रपतींना पत्नी नसेल तर त्यांनी त्यांच्या मुली, बहिणी आणि भाचींनाही प्रथम महिलाचा दर्जा दिला आहे.