केंद्र सरकारने अधिसूचना जारी करून दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी ‘हैदराबाद मुक्ति दिन साजरा’ करण्याचा निर्णय घेतला आहे.हैदराबाद स्वातंत्र्य लढ्यातील शहीदांचे बलीदान लक्षात राहावे यासाठी ‘हैदराबाद मुक्ती दिन’ साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हा दिवस साजरा करण्याची मागणी वेळोवेळी होत होती. पण आता सरकारने अधिसूचना जारी करून दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी ‘हैदराबाद मुक्ती दिन’ साजरा करण्यास मान्यता दिली आहे.
हैदराबादच्या इतिहासात 17 सप्टेंबरला ऐतिहासिक महत्त्व आहे. या दिवशी हैदराबादला निजामशाहीपासून स्वातंत्र्य मिळाले आणि ते भारतीय संघराज्याचा भाग बनले. केंद्रीय गृह मंत्रालयाने अधिसूचनेत म्हटले आहे की, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैदराबादला 13 महिने स्वातंत्र्य मिळाले नाही आणि ते निजामाच्या अधिपत्याखाली होते. ‘ऑपरेशन पोलो’ नावाच्या पोलिस कारवाईनंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी हा परिसर निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला.
अधिसूचनेत पुढे म्हटले आहे की, 17 सप्टेंबर हा हैदराबाद मुक्ति दिन म्हणून साजरा करावा, अशी परिसरातील लोकांची मागणी होती. गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, हैदराबाद मुक्त करणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण करण्यासाठी आणि तरुणांच्या मनात देशभक्तीची ज्योत जागृत करण्यासाठी भारत सरकारने दरवर्षी 17 सप्टेंबर हा हैदराबाद मुक्ति दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.