लोकसभा निडणूक तोंडावर येऊन ठेपली असतानाच आता शिवसेनेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांच्या बारामतीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच याबाबत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने ठराव पास करण्यात आला असल्याचे विजय शिवतारेंनी सांगितले आहे.
आज (13 मार्च) विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. “बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नाहीये, तो देशातील 543 पैकी एक मतदारसंघ आहे. त्यामुळे येथे मालकी कोणाचीही नाहीये. तसेच पवार-पवार करण्यापेक्षा आपण आपला स्वाभीमान जागा करून लढले पाहिजे”, असे विजय शिवतारे म्हणाले.
पुढे त्यांनी सांगितेल की, “2019 च्या निवडणुकीत मी अजित पवार यांच्या मुलाच्या विरोधात प्रचार केला होता, पण तो राजकारणाचा भाग आणि माझे कर्तव्य म्हणून केला होता. मात्र, अजित पवारांनी सभ्येतची नीच पातळी गाठली होती. 23 दिवस मी लिलावती हॉस्पिटलमध्ये भरती होतो. तरीही मी अॅम्ब्युलन्समधून प्रचार केला होता. त्याला अजित पवारांनी पालखी दौरा असल्याचे म्हटले होते. मरायला लागलाय तरी कशाला निवडणूक लढवताय..लोकांच्या सहानुभूतीसाठी तुम्ही खोटं बोलत आहात..माझ्या गाडीचा नंबर, कोणची-कोणत्या कंपनीची इथपर्यंत अजित पवार खालच्या थरापर्यंत आले होते. तसेच तु कसा निवडूण येतो तेच बघतो.. कारण महाराष्ट्रात मी कोणाला पाडायचं ठरवलं तर मी पाडतो म्हणजे पाडतोच, असे अजित पवार म्हणाले होते.
या प्रकराची उर्मट भाषा अजित पवारांनी केली होती. मी त्यासाठी त्यांना माफ केलं आहे. तसेच ते महायुतीत आले तेव्हा मी त्यांचा सत्कार केला, तरीही त्यांची गुर्मी तशीच होती. ते कोणाशीच नीट बोलत नाहीत. त्यांच्याबाबत संपूर्ण बारामती मतदारसंघात लोक म्हणत आहेत की, अजित पवार हे उर्मट आहेत त्यामुळे आम्ही त्यांना मतदान करणार नाही, सुप्रिया सुळेंना मतदान करू. त्यावेळी मी ठरवलं की, बारामतीत पवारांच्या समर्थनात 6 लाख 86 हजार मतदार आहेत, पण 5 लाख 50 हजार मतदार पवार विरोधात आहेत. त्यामुळे अशा ना आवडत्या लोकांना मतदान न करण्याची संधी मिळाली नाही तर तो लोकशाहीचा घात होतो, हे लक्षात आल्यानंतर मी निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे, असेही शिवतारे म्हणाले.