पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (13 मार्च) दुपारी 4 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सामाजिक उन्नती आणि रोजगारावर आधारित लोककल्याणासाठी राष्ट्रीय ‘पीएम-सूरज पोर्टल’ लाँच करणार आहेत. तसेच यावेळी वंचित घटकातील एक लाख उद्योजकांना कर्ज सहाय्य मंजूर करण्यात येणार आहे.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुसूचित जाती, मागासवर्गीय आणि स्वच्छता कामगारांसह वंचित गटांमधील विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत.
पीएम-सूरज राष्ट्रीय पोर्टल वंचितांना प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. हा एक मोठा परिवर्तनाचा उपक्रम आहे. समाजातील सर्वात वंचित घटकांचे उत्थान करणे हा त्याचा उद्देश आहे. तसेच बँका, नॉनबँकिंग वित्तीय कंपन्या (NBFC), सूक्ष्म वित्त संस्था (MFI) आणि इतर संस्थांद्वारे देशभरातील पात्र व्यक्तींना कर्ज सहाय्य प्रदान केले जणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान नॅशनल ॲक्शन फॉर मेकॅनिकल सॅनिटेशन योजनेंतर्गत सफाई मित्रांना (गटार आणि सेप्टिक टँक कामगार) आयुष्मान हेल्थ कार्ड आणि पीपीई किटचे वाटप करणार आहेत. हा उपक्रम आव्हानात्मक परिस्थितीत काम करणाऱ्या आघाडीच्या कामगारांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी आणखी एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. विविध शासकीय योजनांपासून वंचित गटातील सुमारे तीन लाख लाभार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. देशभरातील 500 हून अधिक जिल्ह्यांमधून हे लोक या कार्यक्रमात सामील होतील.