आज हरियाणाचे नवे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला, जो आवाजी मतदानाने मंजूर झाला आहे. म्हणजेच हरियाणाच्या नव्या सरकारने फ्लोर टेस्ट पास केली आहे. तर दुसरीकडे, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी एक दिवस आधी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
राजीनामा दिल्यानंतर खट्टर विधानसभेत म्हणाले, ‘माझे जे काम होते ते मी केले आहे. मात्र, आता हे काम अधिक सुरळीतपणे पुढे जावे लागणार आहे. मी सभागृहासमोर जाहीर करतो की मी कर्नाल विधानसभेचा राजीनामा देत आहे. आजपासून नायब सैनी कर्नाल विधानसभेची जबाबदारी स्वीकारणार आहेत. तसेच माझ्यावर जी काही जबाबदारी सोपवली जाईल, ती मी अधिक सुरळीतपणे पार पाडेन.
खट्टर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या कर्नाल जागेवरून नवे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी हे पोटनिवडणूक लढवणार आहेत. सध्या ते हरियाणातील गुरुक्षेत्र येथून खासदार आहेत.
दरम्यान, मनोहर लाल खट्टर यांनी 12 मार्च रोजी राजीनामा दिल्यानंतर काही तासांनी नायब सिंह सैनी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर त्यांनी राज्यपालांना भेटून विश्वासदर्शक ठराव मांडण्याचा प्रस्ताव ठेवला. सैनी यांनी आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला, जो आवाजी मतदानाने मंजूर झाला. यासह हरियाणाच्या नवीन सैनी सरकारने फ्लोर टेस्ट पास केली.