इंग्लंडविरुद्ध आपल्या फिरकीच्या चेंडूंनी धुमाकूळ घालणारा फिरकी गोलंदाज आर अश्विनला त्याच्या चमकदार कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अश्विन हा जगातील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. अश्विनने जसप्रीत बुमराहला मागे टाकले आहे. त्याचबरोबर भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही मोठी कामगिरी केली आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत तो टॉप-10 मध्ये आला आहे. ताज्या ICC रँकिंगच्या टॉप-10 फलंदाजांच्या चार्टमध्ये तो सहाव्या क्रमांकावर आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 26 विकेट घेतल्याबद्दल अश्विनला जसप्रीत बुमराहला मागे टाकून या वर्षाच्या सुरुवातीला अव्वल स्थानावर पोहोचण्यास मदत झाली. जसप्रीत बुमराहला मागे टाकत अश्विन क्रिकेटच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये जगातील नंबर वन गोलंदाज बनला आहे. अश्विनचे एकूण 870 रेटिंग गुण आहेत. अश्विननंतर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड दुसऱ्या स्थानावर आहे. बुमराह तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. मात्र, बुमराह आणि हेजलवूडचे रेटिंग गुण समान आहेत.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आर अश्विनने आपल्या फिरत्या चेंडूंनी इंग्लिश फलंदाजांना हैराण केले होते. अश्विनने 5 कसोटी सामन्यात एकूण 26 विकेट घेतल्या आहेत. अश्विनने कसोटी मालिकेत दोन्ही संघांकडून सर्वाधिक बळी घेतले आहेत.
अश्विनचा सहकारी कुलदीप यादवने त्याच्या कारकिर्दीतील नवे सर्वोच्च रेटिंग मिळवले आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध 7 विकेट्स घेतल्यानंतर आणि त्याला सामनावीर म्हणून घोषित केल्यानंतर त्याने क्रमवारीत 15 स्थानांची झेप घेतली आहे. तो 16 व्या स्थानावर पोहोचला आहे.