भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोब्गे 14 ते 18 मार्च या कालावधीत भारताच्या अधिकृत दौऱ्यावर येणार आहेत. जानेवारी 2024 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान तोब्गे यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान तोब्गेयांच्यासोबत येणाऱ्या शिष्टमंडळात परराष्ट्र व्यवहार आणि परकीय व्यापार मंत्री, ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधने मंत्री, उद्योग, वाणिज्य आणि रोजगार मंत्री आणि भूतानच्या शाही सरकारचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश असेल. या भेटीदरम्यान भूतानचे पंतप्रधान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील आणि पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा करतील. परराष्ट्र मंत्री आणि इतर मान्यवर भूतानच्या पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. या काळात पंतप्रधान तोब्गे मुंबईलाही भेट देणार आहेत.
भारत आणि भूतानमध्ये सर्व स्तरांवर विश्वास, सद्भावना आणि परस्पर समंजसपणावर आधारित मैत्री आणि सहकार्याचे अनुकरणीय संबंध आहेत. भूतानच्या पंतप्रधानांच्या भेटीमुळे दोन्ही बाजूंना अनोख्या भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेण्याची आणि भारत आणि भूतानमधील मैत्री आणि सहकार्याचे चिरस्थायी संबंध वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा करण्याची संधी मिळेल.