इन्कम टॅक्स विभागाने काँग्रेस पक्षाला 105 कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस बजावली आहे. ही नोटीस स्थगित करण्यासाठी काँग्रेसने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु, आयटीएटीचा आदेश कायम ठेवत न्यायालयाने काँग्रेसची याचिका फेटाळून लावली आहे. तसेच काँग्रेसला आयटीएटीमध्ये नव्याने युक्तीवाद करण्यास सांगितले आहे.
इन्कम टॅक्स विभागाने काँग्रेसला 105 कोटींहून अधिकच्या थकबाकीसाठी वसुलीची नोटीस पाठवली होती. याप्रकरणी काँग्रेसने आयटीएटी या आयकर अपिलीय न्यायाधिकरणाकडे अर्ज सादर केला होता. परंतु, आयटीएटीने काँग्रेसचा अर्ज फेटाळल्यामुळे काँग्रेसने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी न्या. यशवंत वर्मा आणि न्या. पुरुषेद्र कौरव यांच्या खंडपीठापुढे 12 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने काँग्रेसला खडसावले होते.
हे प्रकरण 2021 चे असून आतापर्यंत काय करीत होतात असा सवाल कोर्टाने उपस्थित केला होता. त्यानंतर यासंदर्भातील निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर आज, बुधवारी कोर्टाने आयटीएटीचा आदेश कायम ठेवत काँग्रेसची याचिका फेटाळून लावली.