पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रधानमंत्री सामाजिक उत्थान आणि रोजगार-आधारित सार्वजनिक कल्याण (PM-SURJ) राष्ट्रीय पोर्टल लाँच केले आहे. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज आमचे सरकार सफाई मित्रांना (गटार आणि सेप्टिक टँक कामगार) आयुष्मान हेल्थ कार्ड आणि पीपीई किटचे वाटप करत आहे.तसेच या लोकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांचे मोफत आरोग्य उपचारही मिळणार आहेत. आज देश दलित, मागासलेल्या आणि वंचित समाजाच्या कल्याणाची आणखी एक मोठी संधी पाहत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या भाषणात सांगितले की, वंचितांसाठी कसे काम केले जाते ते या कार्यक्रमात दिसून येत आहे. आज वंचित वर्गातील एक लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर 720 कोटी रुपयांची मदत थेट पाठवण्यात आली आहे. याआधीच्या सरकारांमध्ये इथे बटन दाबले जाईल आणि गरिबांच्या बँक खात्यात पैसे पोहोचतील याची कल्पनाही कोणी केली नसेल, पण हे मोदींचे सरकार आहे, गरिबांचा पैसा थेट त्यांच्या खात्यात पोहोचतो.
मी तुम्हा सर्वांपेक्षा वेगळा नाही, मला तुमच्यामध्ये माझा परिवार दिसतो. म्हणूनच जेव्हा विरोधी लोक माझ्यावर टीका करतात आणि म्हणतात की मोदींना घराणेशाही नाही, तेव्हा मला सर्वात आधी तुमचा विचार येतो. जेव्हा तुम्ही ‘मी मोदींचा परिवार आहे’ असे म्हणता तेव्हा मी स्वतःला भाग्यवान समजतो. 2014 मध्ये आमच्या सरकारने सबका साथ-सबका विकास या संकल्पनेसह काम करण्यास सुरुवात केली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पीएम-सूरज राष्ट्रीय पोर्टल लाँच करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ज्यांनी सरकारकडून आशा सोडली होती त्यांच्यापर्यंत सरकार पोहोचले आणि त्यांना देशाच्या विकासात भागीदार बनवले. मागील सरकारमध्ये लाखो कोटी रुपयांचे घोटाळे झाले. पण आमचे सरकार दलित आणि वंचितांच्या कल्याणासाठी आणि देशाच्या विकासासाठी हा पैसा खर्च करत आहे. मात्र, वंचित घटकातील लोकांचे जीवन सुसह्य व्हावे असे काँग्रेसवाल्यांना कधीच वाटत नाही. तरुण पुढे आले तर घराणेशाहीचे राजकारण थांबेल, हे त्या लोकांना माहीत आहे, अशी टीकाही मोदींनी केली.