लोकसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. बराकपूर मतदारसंघातील खासदार अर्जुन सिंह यांनी भारतीय जनता पक्षात घरवापसी करणार असल्याचे जाहीर केले आहे. काहीच दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेस पक्षाकडून २०२४ च्या येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठीचे ४२ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. यामध्ये अर्जुन सिंह यांना डावलत ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री असलेल्या पार्थ भौमिक यांना बॅरकपूर मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची वेळ आणि तारखेचा उल्लेख केलेला नाही.मात्र “हे निश्चित आहे; मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. मी येथे किंवा दिल्लीत, कुठेही प्रवेश करू शकतो. पक्ष मला जे काम देईल ते मी करेन,” असे ते म्हणाले आहेत.
तृणमूल काँग्रेस सोडण्याचे कारण देताना अर्जुन सिंह म्हणाले की, आपल्यावर अन्याय झाला आहे.मात्र त्यांचे उत्तर जनताच तृणमूल काँग्रेसला देईल, असे ते म्हणाले आहेत. तसेच आपल्याबरोबर तृणमूल मधील एक जेष्ठ नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे. पक्षाकडून आपली फसवणूक झाली असल्याचे सिंह यांनी आधी माध्यमासमोरही सांगितले होते. अर्जुन सिंह यांना लोकसभेचे तिकीट न मिळाल्यामुळे त्यांच्या समर्थकांनीही विरोध प्रदर्शन केले आहे.
अर्जुन सिंह यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि बॅरकपूर जागेवर तत्कालीन टीएमसी उमेदवाराचा पराभव केला होता . पण २०२२ मध्ये ते पुन्हा टीएमसीमध्ये गेले होते.