शरद पवार यांचं नाव आणि फोटो वापरू नये, या संदर्भात हमीपत्र लिहून द्यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला दिले आहेत. त्याचबरोबर अजित पवार गटाने घड्याळ चिन्ह वापरू नये, असे निर्देशही न्यायालयाने सुनावणी वेळी दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार गटाला दिले. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. शरद पवार गटाकडून दाखल केलेल्या याचिकेवर आज (गुरुवारी) न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी अजित पवार हे आमच्या लोकप्रियतेचा वापर करत असल्याचा दावा शरद पवार गटाने केला. शरद पवार यांचा फोटो आणि घड्याळ चिन्ह वापरण्यावरही त्यांनी आक्षेप नोंदवला.
शरद पवारांचा फोटो, घड्याळ वापरणे ही फसवणूकच – अभिषेक मनु सिंघवी
शरद पवार गटाकडून वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला. यावेळी त्यांनी अजित पवार गट शरद पवारांचा फोटो आणि घड्याळ कसं वापरतात, ही फसवणूक आहे. त्यांच्या लोकप्रियतेचा वापर का केला जातो, असा सवाल उपस्थित केला. त्याचबरोबर वकील मनु सिंघवी यांनी अजित पवार गटाचे शरद पवार यांचा फोटो वापरलेले पोस्टर्स देखील दाखवले.
ग्रामीण भागात घड्याळ हे चिन्ह प्रसिद्ध आहे. छगन भुजबळ म्हणतात, ग्रामीण भागात हे पोस्टर्स कायम ठेवा कारण आजही शरद पवार यांची लोकप्रियता कायम आहे. ग्रामीण मतदारांना आकर्षित करण्यासाठी पोस्टरमध्ये ‘घड्याळ’ चिन्ह आणि शरद पवारांची चित्रे वापरावीत. यावर आक्षेप घेत आमचा फोटो, घड्याळ वापरण्याची परवानगी देऊ नका ही आमची मागणी आहे, असा युक्तीवाद केला.
त्यावर न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले की, शरद पवार यांच्या नावाचा आणि छायाचित्राचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर करणार नाही, असे हमीपत्र दाखल करावे. त्याचबरोबर अजित पवार गटाने निवडणुकीसाठी ‘घड्याळ’ या चिन्हाशिवाय दुसरे चिन्ह वापरावे, जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही, असेही न्यायालयाने तोंडी सुचवले आहे.
तुमच्या पक्षाला आता निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एनसीपी) अशी ओळख मिळाली असताना तुम्ही पक्ष प्रमुख शरद पवार यांचा फोटो का वापरता? असा फोटोचा वापर का करता?, असा प्रश्न विचारत तुम्ही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अशा कोणत्याही प्रकारे शरद पवार यांचा फोटो वापरू शकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
पक्षाने आपल्या सदस्यांना शिस्त लावणे आवश्यक
तुम्ही त्यांची छायाचित्रे का वापरत आहात? तुम्हाला एवढा विश्वास असेल, तर तुमची छायाचित्रे वापरा?” अशी विचारणा अजित पवार गटाची बाजू मांडणारे वकील मनिंदर सिंग यांना न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी केली. त्यावर मनिंदर सिंग म्हणाले की, पक्ष ते करत नाही आणि रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांनी केले असावे. कार्यकर्त्यांद्वारे सर्व सोशल मीडिया पोस्टर्सवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार नाही. तेव्हा खंडपीठाने स्पष्टपणे सांगितले की, पक्षाने आपल्या सदस्यांना शिस्त लावणे आवश्यक आहे.
अजित पवार गटही वेगळं चिन्ह घेऊन निवडणूक का लढवत नाही?
यावेळी अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हाचा वापर करण्यावर सिंघवींनी घेतलेल्या आक्षेपावरही न्यायालयाने मत नोंदवलं. आम्ही तुम्हाला हा सल्ला देत आहोत की, तुम्ही घड्याळ चिन्हाचा वापर न करता दुसऱ्या कुठल्यातरी चिन्हाचा वापर करा. निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात न्यायालयासमोर याचिका आलेली आहे. जर आम्ही आयोगाचा निकाल रद्दबातल ठरवला, ऐन निवडणुकीच्या मध्यावर आमचा निकाल आला तर तुम्ही काय कराल?” असा प्रश्न न्यायालयाने केला. त्यामुळे शरद पवार गटाकडे वेगळं चिन्ह आहे, तर अजित पवार गटही वेगळं चिन्ह घेऊन निवडणूक का लढवत नाही? जेणेकरून न्यायालयाच्या निकालाचा कोणताही परिणाम तुमच्यावर होणार नाही आणि तुमचं काम तुम्हाला विनासायास करता येईल. या सल्ल्यावर तुम्ही विचार करा, असे न्यायालयाने नमूद केले. यावर शनिवारी आम्ही प्रतिज्ञापत्र सादर करू, असे अजित पवार गटाने स्पष्ट केले आहे.