महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. कारण नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोठचिठ्ठी दिलेले वसंत मोरे आणि अजित पवार गटातील आमदार निलेश लंके हे शरद पवार गटाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. एकाचवेळी वसंत मोरे आणि निलेश लंके शरद पवार गटाच्या कार्यालयात पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
काही दिवसांपासून आमदार निलेश लंके हे शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच आज ते पुण्यातील शरद पवार गटाच्या कार्यालयात खासदार अमोल कोल्हे यांना भेटण्यासाठी आले होते. त्याचवेळी वसंत मोरे देखील शरद पवारांना भेटण्यासाठी कार्यालयात आले होते. यादरम्यान वसंत मोरे आणि निलेश लंके या दोघांनी काहीवेळ शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केली. त्यामुळे आता वसंत मोरे आणि निलेश लंके शरद पवार गटात जाणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
वसंत मोरेंनी ज्यावेळी शरद पवारांची भेट घेतली त्यावेळी खासदार अमोल कोल्हे देखील उपस्थित होते. तर या भेटीबाबत वसंत मोरेंना विचारण्यात आले असता, ते म्हणाले की, माझा अद्याप कोणताही विचार नाही. मी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मी फक्त शरद पवारांना भेटण्यासाठी आलो होतो, असे मोरेंनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, निलेश लंके आणि वसंत मोरे हे शरद पवार गटात जाणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तसेच वसंत मोरे हे शरद पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.