श्रीलंकेचा माजी कर्णधार लाहिरू थिरिमने याचा भीषण कार अपघात झाला आहे. अनुराधापुरा येथील थिरापने परिसरात हा अपघात झाला आहे. लाहिरू थिरिमने याची कार एका ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात थिरिमने थोडक्यात बचावला असून त्याच्या कारचा चक्काचूर झाला आहे. सध्या त्याच्या अपघाताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच लाहिरू थिरामने याच्या अपघाताचे फोटो पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.
लाहिरू थिरिमने याच्या अपघातानंतर आजूबाजूच्या लोकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर अनुराधापूर येथील टिचिंग रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या अपघातात थिरिमनेला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही आणि त्याची जखम फार मोठी नाही, ही दिलासादायक बाब आहे.
लाहिरू थिरिमने सध्या लेजेंड्स क्रिकेट ट्रॉफी 2024 मध्ये न्यूयॉर्क स्ट्रायकर्सकडून खेळत आहे. न्यूयॉर्क स्ट्रायकर्सने एक निवेदन जारी केले की, अपघातादरम्यान थिरिमने याचे कुटुंब देखील कारमध्ये होते, परंतु सुदैवाने अपघातात इतर कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही आणि सर्वांना तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
लाहिरू थिरिमनेचा कार अपघात पाहून क्रिकेट चाहत्यांना टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतची आठवण झाली. 30 डिसेंबर 2022 रोजी पंतचा भीषण कार अपघात झाला होता, ज्यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर पंतवर शस्त्रक्रियाही झाली आणि त्याला अत्यंत कठीण टप्प्यातून जावे लागले.
दरम्यान, लाहिरू थिरिमनेने 2023 च्या विश्वचषकापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. गेल्या एक वर्षापासून या डावखुऱ्या खेळाडूकडे संघाकडून दुर्लक्ष केले जात होते आणि त्यानंतर लाहिरूने निवृत्ती जाहीर केली. तर लाहिरू याने श्रीलंकेसाठी 44 कसोटी, 27 एकदिवसीय आणि 26 टी-20 सामने खेळले आहेत. 2014 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत थिरिमने याला श्रीलंका संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा संघही चॅम्पियन झाला होता.