पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. मात्र, काल रात्री त्यांना कोलकाता रुग्णालयातून उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे.
ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला तीन टाके पडले असून एक टाका नाकाला आहे. जखमी झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांना तातडीने एसएसकेएम ट्रॉमा सेंटरमध्ये आणण्यात आले होते. तसेच उपचारानंतर तेथून रात्री 10.30 वाजता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आता त्यांची आज पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.
तत्पूर्वी, एसएसकेएम रुग्णालयाचे संचालक मनिमॉय बंदोपाध्याय यांनी सांगितले होते की, गुरुवारी सायंकाळी 7.30 वाजता डॉक्टरांना सांगण्यात आले की, कोणीतरी ममता बॅनर्जींना घरात ढकलले, त्यामुळे त्यांचे डोके व नाक आदळले आणि रक्तस्त्राव सुरू झाला. मुख्यमंत्र्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन कालीघाट येथील निवासस्थानी परत घेऊन गेल्यानंतर सुमारे तासाभरात मणिमॉय बंदोध्याय यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, “मुख्यमंत्र्यांना संध्याकाळी साडेसात वाजता रुग्णालयात आणण्यात आले. कदाचित मागून ढकलून दिल्याने त्या पडल्या आणि कपाळावर खोल जखम झाली. त्या जखमेतून खूप रक्त वाहत होते.”
दरम्यान, आता एसएसकेएमच्या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे की, ममता बॅनर्जी यांना कोणीही मागून ढकलले नाही, तर काही थरकाप किंवा अस्वस्थतेमुळे त्या पडल्या आणि त्यांच्या कपाळावर आणि नाकाला दुखापत झाली.
ममता बॅनर्जींवर न्यूरोसर्जरी, जनरल मेडिसिन आणि कार्डिओलॉजी विभागातील तज्ज्ञांकडून उपचार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. इलेक्ट्रोकार्डियोग्राम आणि सीटी स्कॅन सारख्या अनेक वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या. हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी बॅनर्जींना तिथेच थांबण्याचा सल्ला दिला होता, पण त्यांनी घरी परतण्याचा आग्रह धरला”, असेही एसएसकेएमच्या डॉक्टरांनी सांगितले. तसेच आता पुढील वैद्यकीय तपासणीसाठी मुख्यमंत्र्यांना आज पुन्हा रुग्णालयात आणण्यात येणार आहे. सध्या त्यांना त्यांच्या निवासस्थानी वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.