गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील महत्त्वाच्या निर्णयांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदींनी अशक्य वाटणारी सर्व कामे पूर्ण केली आहेत. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवणे असो किंवा वन रँक वन पेन्शनची अंमलबजावणी असो, अशी अनेक कामे त्यांनी केली आहेत, असे अमित शाह म्हणाले.
गुजरात सरकारच्या एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळाबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी अहमदाबाद आणि गांधीनगर जिल्ह्यात 3,012 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटनही केले. यावेळी ते म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत मी ज्या प्रकल्पांचे भूमिपूजन केले आहे त्यापैकी 91 टक्के प्रकल्प पूर्ण झाले आहेत.
पुढे अमित शाह यांनी आपल्या भाषणात भाजपच्या 2014 च्या जाहीरनाम्याचा उल्लेख केला. ते म्हणाले की, 2014 मध्ये भाजपचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर भाजपने गेल्या 50 वर्षांपासून प्रलंबित अशा अनेक अपूर्ण कामांचा समावेश आपल्या जाहीरनाम्यात केला होता. तसेच अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्याच्या आमच्या आश्वासनावर विरोधक आमच्यावर हसायचे. पण आता पंतप्रधानांनी प्रभू श्रीरामांची ‘प्राणप्रतिष्ठा’ केल्यानंतर राम मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले आहेत. पंतप्रधान मोदींनी आपल्या कार्यकाळात प्रत्येकाला अशक्य वाटणारी सर्व कामे पूर्ण केली आहेत. काश्मीरमधून कलम 370 हटवणे असो किंवा वन रँक वन पेन्शन लागू करणे असो.
अमित शाह यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारच्या इतर अनेक कामगिरीचीही नोंद केली. पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात 80 कोटी नागरिकांना मोफत रेशन, गरिबांसाठी 12 कोटी शौचालये बांधणे, चार कोटी नागरिकांना घरांचे वाटप, 10 कोटी घरांना गॅस कनेक्शन आणि 14 कोटी लोकांना नळ कनेक्शन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आज मी कुठेही जातो, तिथे जनतेची मते पाहता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचे स्पष्ट होत आहे, असेही अमित शाह म्हणाले.