पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांना तातडीने एसएसकेएम ट्रॉमा सेंटरमध्ये आणण्यात आले होते. तर ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला तीन टाके पडले असून एक टाका नाकाला आहे. तसेच उपचारानंतर तेथून रात्री 10.30 वाजता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आज बॅनर्जींची पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.
ममता बॅनर्जी यांच्या दुखापतीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. “मी ममता दीदींना लवकर बरे होण्यासाठी आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो”, असे पंतप्रधान मोदींनी X वर पोस्ट करत म्हटले आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1768316307005702164
ममता बॅनर्जींच्या अपघातानंतर पश्चिम बंगालचे राज्यपाल आनंद बोस रुग्णालयात पोहोचले होते. त्यानंतर रुग्णालयाबाहेर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “मी डॉक्टरांच्या वैयक्तिक पडताळणीसाठी आलो आहे. त्यांनी मला आश्वासन दिले की सर्व काही नियंत्रणात आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना उत्तम वैद्यकीय सेवा मिळत आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणात आहे.”
दरम्यान, एसएसकेएम रुग्णालयाचे संचालक मनिमॉय बंदोपाध्याय यांनी सांगितले होते की, गुरुवारी सायंकाळी 7.30 वाजता डॉक्टरांना सांगण्यात आले की, कोणीतरी ममता बॅनर्जींना घरात ढकलले, त्यामुळे त्यांचे डोके व नाक आदळले आणि रक्तस्त्राव सुरू झाला. मुख्यमंत्र्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन कालीघाट येथील निवासस्थानी परत घेऊन गेल्यानंतर सुमारे तासाभरात मणिमॉय बंदोध्याय यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, “मुख्यमंत्र्यांना संध्याकाळी साडेसात वाजता रुग्णालयात आणण्यात आले. कदाचित मागून ढकलून दिल्याने त्या पडल्या आणि कपाळावर खोल जखम झाली. त्या जखमेतून खूप रक्त वाहत होते.”
अशातच आज एसएसकेएमच्या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे की, ममता बॅनर्जी यांना कोणीही मागून ढकलले नाही, तर काही थरकाप किंवा अस्वस्थतेमुळे त्या पडल्या आणि त्यांच्या कपाळावर आणि नाकाला दुखापत झाली आहे.